मुंबई : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबरला ८१ वा वाढदिवस साजरा होत आहे. राज्यभरात पवार यांच्या वाढदिवसाचे सोहळे सुरू झालेले आहेत. या निमित्त मुंबईत आज लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शरद पवार यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला आहे. यावेळी पवार यांची कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याच्या खुबीवर चर्चा झाली. यावेळी पवार यांनी एक किल्ला सांगितला. तो सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा आहे.
राजकारणात फार कमी कष्टाने आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळते. फक्त तुम्ही समोरच्या माणसाचे नाव लक्षात ठेवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातलीच होती. तिचे काहीतरी काम होते. मी तिला म्हटले, की काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?. यावर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली. काम होवो न होवो, अशी तिची भावना होती, असा किस्साच शरद पवार यांनी उपस्थितांना ऐकवला.