
एफसी गोवा क्लबला मागील लढतीत पराभूत करणाऱ्या नॉर्थ ईस्ट युनायटेडला चांगलीच मेहनत घ्यावी लागली. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या ओडिशा एफसीनं पहिल्या हाफमध्ये चेंडूवर सर्वाधिक काळ ताबा राखताना पासिंगचा सुरेख खेळ केला. ओडिशानं चेंडूवर सर्वाधिक ६१ टक्के ताबा मिळवला, परंतु पहिल्या हाफमधील अखेरच्या १० मिनिटांत नॉर्थ ईस्टचा खेळ उजवा ठरला. दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ शॉट ऑन टार्गेट मारला, तर नॉर्थ ईस्टनं ७ शॉट ऑफ टार्गेट गेले.
दुसऱ्या हाफमध्ये ओडिशानं पहिला बदल करताना डॅनिएल लाल्हलिम्पुईयाच्या जागी जेरी माविह्मिंगथांगा मैदानावर उतरवले. नॉर्थ ईस्टनं पहिल्या हाफच्या शेवटी जो खेळ सुरू केला, तो दुसऱ्या हाफमध्येही कायम राखताना गोल करण्याचं सातत्यानं प्रयत्न होतच राहिले. ८०व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांना गोलशून्य कोंडी फोडता आलेली नव्हती. पण, ८१व्या मिनिटाला थोईबा सिंगच्या क्रॉस पासवर जॉनाथस ख्रिस्टीयननं हेडरवर गोल केला अन् ओडिशा एफशीनं १-० अशी आघाडी घेतली. ९०व्या मिनिटाला ओडिशाला एक फ्री किक मिळाली, पण त्यांना आघाडी वाढवता आली नाही.