मात प्रियकर किंवा प्रेयसीने दुसऱ्याला विसरून जाणे हा एक अटळ भाग असत आला आहे. पडद्यावरही आणि वास्तव जीवनातही! मग तो ‘शाकुंतल’मधील राजा दुष्यंत असो की, राजकपूरच्या ‘बरसात’मधील गोपालसारखा (प्रेमनाथ) मनमौजी प्रियकर! मात्र गीतकारांनी त्या विसरण्यातूनही अजरामर गाणी लिहून ठेवलीत. ‘एक नजर’१९७२ हा अमिताभ, जया भादुरी आणि नादिराच्या प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक सिनेमा. जयाभादुरी चक्क एक नर्तिका असते, तर अमिताभ एक मनस्वी कवी! लक्ष्मीकांत-प्यारेलालनी लतादीदीच्या आवाजातले हे विरहगीत नाजूकपणे प्रेक्षकांसमोर उलगडले होते. प्रियेने केलेल्या अगतिक प्रतीक्षेची वेदना व्यक्त करणारे ते गाणे लिहिले होते मजरूह सुलतानपुरींनी –
हमी करे कोई सूरत उन्हे बुलाने की,
सूना है उनको तो आदत है भूल जाने की
हमी करे कोई सूरत…
एक शेर मोठा मिश्कील होता –
जफ़ा के ज़िक्र पे, तुम क्यों संभल के बैठ गए?
तुम्हारी बात नहीं, बात हैं जमाने की…
ती म्हणते दगा देण्याचा नुसता उल्लेख केला, तर तू लगेच सावरून का बसतोस? मी तर जगाविषयी बोलत होते! (म्हणजे तुझ्या मनात काळेबेरे आहेच वाटते!) पण सांगायची पद्धत बघा. प्रेम इतके की, प्रियकराने चुकून नाराज होऊन निघून जाऊ नये म्हणून ती उलट त्यालाच विनवते –
जो हम सताए, तो कतरा के इस तरह से न जा,
निगाहेनाज़ ये बाते है दिल दुखाने की,
हमी करे कोई सूरत…
जबरदस्त आशय, तो मांडायची ग्रेसफूल पद्धत आणि संगीताचा भावनेला हात घालणारा वापर हे त्या काळी सिनेगीतांचे वैशिष्ट्यच होते!
असेच वाट पाहण्यावर करूण रसातील गाणे होते १९५२च्या बैजू बावरात. शकील बदायुनींचे शब्द नौशादच्या दिग्दर्शनात गायले होते लतादीदीने! गाण्याआधीच्या शेरवजा ओळी तिच्या त्यावेळच्या टिपिकल आवाजात होत्या.
जो मैं ऐसा जानती के प्रीत किये दुख होय,
नगर ढिंढोरा पीटती के प्रीत न करियो कोय…
त्या काळचे प्रेक्षक फक्त घटकाभर मजेत काढायचा म्हणून सिनेमागृहात आलेले हौशे नसायचे! त्यांना एक अभिरुची असायची, ते कथेत समरस होत! त्यामुळे हिंदीच्या एका गोड बोलीभाषेतले गाण्याचे ते शब्द काळजाला भिडत –
मोहे भूल गए साँवरिया,
आवन कह गये, अजहुं न आये,
ली न मोरी खबरिया, मोहे भूल गए…
विजय भट यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या मीनाकुमारी आणि भारतभूषण यांच्या. अगदी साधे पण प्रांजळ शब्दही किती ताकदवान ठरू शकतात, ते या गाण्यातील मीनाकुमारीच्या अभिनयाने कळते. सोडून गेलेल्या प्रियकराच्या पश्चात ती त्याची तक्रार किती अगतिकपणे करतेय –
दिल को दिए क्यों दुख बिरहा के, तोड़ दिया क्यों महल बना के,
आस दिला के, ओ बेदर्दी फेर ली काहे नजरिया…
मोहे भूल गए…
अशा प्रेमभंगाने केवळ प्रिय व्यक्तीवरचा नाही, तर सगळ्या जगावरचा विश्वास उडतो. सगळे जगणेच निरर्थक वाटू लागते. आपल्याला जे सापडल्यासारखे वाटले ते प्रेम एक स्वप्नच होते ही जाणीव मनाला उदास करून टाकते.
नैन कहे रो-रोके सजना, देख चुके हम प्यारका सपना,
प्रीत है झूठी, प्रीतम झूठा, झूठी है सारी नगरिया…
कधी-कधी मात्र गीतकारांनी प्रेमिकातील ताटातूटही फार छानपणे हाताळली! त्यात एक लोभस खेळकरपणाही आणून दाखवला. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे जावेद अख्तर यांचे ‘मशाल’(१९८४)मधील गाणे! ‘मशाल’चे वैशिष्ट्य म्हणजे तो वसंत कानेटकर यांच्या ‘अश्रूंची झाली फुले’वर बेतला होता. याच नाटकावरील ‘आंसू बन गये फूल’ने कानेटकरांना १९६६चे सर्वोत्तम कथेचे फिल्मफेअर मिळवून दिले.
मशालची पटकथा लिहिली जावेद अख्तर यांनी! एखाद्या फुलपाखराने एका फुलावरून दुसऱ्यावर अलगद उडावे तशी उर्दू आणि हिंदी भाषा हाताळणाऱ्या जावेद अख्तर यांची गाण्याची थीमच मोठी रोमँटिक घेतली होती. अनिल कपूर शिक्षणासाठी बंगलोरला निघाला आहे. रती अग्निहोत्री त्याला सोडायला आलीय. ताज्यातवान्या खेळकर प्रेमाचे हे मजेशीर गाणे चक्क रेल्वे डब्यात आणि रुळावरच चित्रित केले गेले.
मुझे तुम याद करना और मुझ को याद आना तुम,
मैं इक दिन लौट के आऊँगा, ये मत भूल जाना तुम,
मुझे तुम…
मी नसताना ‘माझी आठवणही तूच कर आणि माझ्या आठवणीतही तूच ये’ अशी लाघवी मागणी करणारा प्रियकर प्रेयसीला एक आगळी मोकळीकही देतोय –
अकेली होगी तुम देखो, कहीं ऐसा ना हो जाए,
जो अब होठों पे है मुस्कान, वो मुस्कान खो जाए,
ज़रा लोगों से मिलना तुम, ज़रा हँसना-हँसाना तुम
जुने प्रियकर तर प्रेयसीच्या सजण्या-धजण्यावरही बंधने घालत. ते म्हणत –
इस रंग बदलती दुनिया में, इन्सान की नियत ठीक नहीं,
निकला ना करो, तुम सजधज के,
इमान की नियत ठीक नही…
इथे मात्र प्रियकर अजून कुणाशी तरी मैत्री करण्याची मोकळीक देतोय! उलट प्रेयसीच त्याला म्हणते –
मगर तुम लौट के आओगे, ये मत भूल जाना तुम…
ती म्हणते तुलाही कुणी सुंदर मुलगी भेटली आणि तिला तुझ्या मैत्रीची गरज भासली, तर अवश्य मैत्री कर…
अगर लड़की तुम्हें कोई मिले, जो खूबसूरत हो,
तुम्हारी दोस्ती की शायद उसको भी ज़रूरत हो,
अगर वो पास आए, मुस्कुराए मुस्कुराना तुम
प्रेयसीच्या या असल्या विचित्र ऑफरने घाबरलेला अनिल कपूर तिला आठवण देतो –
मगर मैं लौट के आऊँगा, ये मत भूल जाना तुम
मुझे तुम याद करना…
तारुण्यातल्या अशा निरागस प्रेमसंवादाची गोडी काही न्यारीच असते, नाही? तोच तर आपला ‘नॉस्टॅल्जिया!’
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…