कर्ममार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला, तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे. खरोखर, भगवंताला ‘सर्व’ देण्यापेक्षा ‘स्व’ द्यायला शिका. ‘स्व’ दिल्यावर ‘सर्व’ न दिले तरी चालेल, कारण ते आपले - आपल्या मालकीचे राहातच नाही. उलट ‘सर्व’ देऊन ‘स्व’ द्यायचा राहिला, तर ‘सर्व’ दिल्याचे समाधान मिळत नाही. भगवंताला ‘स्व’ देणे म्हणजे ‘मी त्याचा आहे’ ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय.


वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते; परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून करावयाची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मात नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणामध्ये होते. शिवाय, सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्याकारणाने, वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत. म्हणून, आपण कर्ममार्गाने जात असता, कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये, नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे, अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते, त्याबद्दल माझा आक्षेप आहे. एरवी, कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल आदरच आहे.


एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही; परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकेच नव्हे, तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते आणि भगवंताशी एकरूप झालो की, ते त्यामध्ये मुरून जाते. रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे, तर तो सिद्धमंत्र आहे. तो भगवंतापर्यंत नेतो; नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे.


रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे. रामनाम हा ॐकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. श्रीशंकरांपासून तो श्री समर्थांपर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा साडेतीन कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. नाम घेत असता, जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे, असा भरवसा ठेवावा.



Comments
Add Comment

Angaraki Sankashti Chaturthi 2026: तारीख, तिथी, चंद्रोदय वेळ, पूजा विधी व साहित्य

हिंदू धर्मात भगवान श्रीगणेशाला समर्पित असलेले संकष्ट चतुर्थी व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. दर महिन्याच्या

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट होईल.

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

देवर्षी नारद

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी विणेच्या मंजुळ तालावर “नारायण... नारायण” असा नाम जप करीत त्रैलोक्यात अनिरुद्ध

जाणिले ज्याने आयुष्याचे मर्म

मनाचा गाभारा : अर्चना सरोदेया क्षणभंगुर आयुष्य म्हणजे, जणू अळवावरचे पाणी!! क्षणांत भासे