Friday, June 20, 2025

अपघातग्रस्तांना मदत करणारा कल्पेश ठाकूर खरा देवदूत - आ. महेंद्र दळवी

अपघातग्रस्तांना मदत करणारा कल्पेश ठाकूर खरा देवदूत - आ. महेंद्र दळवी
देवा पेरवी

पेण : गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात जखमी होणाऱ्या असंख्य अपघातग्रस्तांना निस्वार्थ भावनेतून मदत करणारा साई सेवक कल्पेश ठाकूर हा खरा देवदूत असल्याचे असे गौरवोद्गार अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी कल्पेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी काढले.
महामार्गावर अपघातात जखमी होणाऱ्या व्यक्तींना स्वतःच्या गाडीतून तातडीने रुग्णालयात दाखल करून हजारो व्यक्तींचे प्राण वाचविणाऱ्या व महाड, पोलादपूर येथील दरडग्रस्तांना मदत करणाऱ्या कल्पेश ठाकूरचा आदर्श जिल्ह्यातील इतर युवकांनी घ्यावा व सामाजिक बांधिलकी जोपासावी असा सल्ला आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी दिला.

कोणताही मोबदला न घेता स्वतःच्या खाजगी गाडीतून सुरू केलेली सेवा व त्यानंतर साई सहारा प्रतिष्ठानच्या ॲम्बुलन्समधून अपघातग्रस्तांना तातडीची मदत देण्यास त्यांनी सुरुवात केली. कोरोना व अपघातात प्राण वाचलेल्या शेकडो प्रवाशांचे आशीर्वाद कल्पेशच्या पाठीशी आहेत. कल्पेशने कोरोना काळात कोकणात पायी गावी निघालेल्या शेकडो नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्न, वस्त्र उपलब्ध करून देऊन कोकणवासीयांना केलेली मदत खरोखरच उल्लेखनीय असून कल्पेश ठाकूरचे भविष्य उज्वल असल्याची प्रतिक्रिया पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी याप्रसंगी बोलताना दिली.

या प्रसंगी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कल्पेश ठाकूर यांचा आमदार महेंद्र दळवी व आमदार रवीशेठ पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, पेणचे आमदार रवीशेठ पाटील, विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, महावितरणचे संजय ठाकूर, राजिपचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, उद्योजक यशवंत घासे, तालुका प्रमुख तुषार मानकवले, सरपंच प्रदीप म्हात्रे, साई सहारा प्रतिष्ठानचे सुनिल पाटील, देवा पेरवी, नरेश पवार, जितेंद्र चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते.
Comments
Add Comment