ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी ९ विकेटनी जिंकताना अॅशेस मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करणाऱ्या पाहुण्यांकडून सातत्य अपेक्षित होते. मात्र, ऑफस्पिनर नॅथन लियॉनच्या फिरकीसमोर इंग्लंडचा डाव कोसळला. त्यांचे ८ फलंदाज अवघ्या ७७ धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे २ बाद २२० धावांवरून इंग्लिश संघाचा डाव चौथ्या दिवशी, शनिवारी उपाहारापूर्वी २९७ धावांमध्ये आटोपला. यजमानांनी २० धावांचे आव्हान अलेक्स कॅरीच्या (९ धावा) बदल्यात पार केले.
इंग्लंडचा दुसरा डाव चौथ्या दिवशी उपाहाराआधी चमकला. शनिवारची सकाळ यजमानांसह लियॉनसाठी सर्वोत्कृष्ट ठरली. जानेवारीमध्ये भारताविरुद्धची गॅबा कसोटी खेळल्यानंतर ३९९ विकेट नावावर असलेल्या ३४ वर्षीय लियॉनला ४०० विकेटचा आकडा खुणावत होता. त्याने दिवसातील त्याच्या दुसऱ्या षटकात तिसऱ्या क्रमांकावरील डॅव्हिड मॅलनला लॅबुशेनद्वारे झेलबाद करताना ११ महिन्यांची प्रतीक्षा संपुष्टात आणली. त्याने ही महत्त्वपूर्ण विकेट घेत तिसऱ्या विकेटसाठीची १६२ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. मॅलनने १९५ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावांची खेळी केली. त्यानंतर मधल्या फळीतील ऑली पोप आणि तळातील ऑली रॉबिन्सन आणि मार्क वुडची विकेट घेत कसोटी क्रिकेटमधील एकूण विकेटची संख्या ४०३वर नेली. मॅलननंतर कर्णधार रूटही लवकर बाद झाला. तो ८९ धावांवर बाद झाला. यामुळे ऑस्ट्रेलियात शतक ठोकण्याचे इंग्लिश कर्णधाराचे स्वप्न पुन्हा एकदा लांबणीवर पडले. कॅमेरॉन ग्रीनने त्याची विकेट घेतली.
बेन स्टोक्स (१४ धावा) आणि ऑली पोप (४ धावा) लवकर परतल्याने ११ धावांमध्ये तीन विकेट पडल्या. तिथेच ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पुन्हा वर्चस्व मिळवले. जोस बटलर (२३ धावा) आणि ख्रिस वोक्सने (१६ धावा) थोडा प्रतिकार केला तरी प्रतिस्पर्ध्यांचे शेपूट फार न वळवळल्याने १०३ षटकांत २९७ धावांमध्ये इंग्लंडचा दुसरा डाव आटोपला. नॅथन लियॉनने (९१-४) दुसऱ्या डावात सर्वाधिक विकेट घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्स आणि कॅमेरॉन ग्रीनने प्रत्येकी २ विकेट घेत त्याला सुरेख साथ दिली.
ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्कृष्ट खेळ करताना नवा कर्णधार, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ‘होमग्राउंड’वरील मालिकेची दिमाखात सुरुवात केली. या पराभवाने पाहुण्यांची संघनिवड आणि रणनीतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कसोटी कर्णधारपदाची विजयी सुरुवात झाल्याने यजमान कर्णधार कमिन्सने आनंद व्यक्त केला आहे. ‘ब्रिस्बेनमध्ये अनेक गोष्टी आमच्या बाजूने घडल्या. त्याची सुरुवात टॉसने झाली. नाणेफेकीचा कौल आमच्याविरुद्ध गेला तरी प्रत्येक सहकाऱ्यांने सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाचे योगदान दिले,’ असे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने सांगितले. पहिल्या कसोटीच्या निकालानंतर निराश झाल्याचे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने म्हटले आहे. अपयशी सुरुवातीनंतर दमदार ‘कमबॅक’ करण्यासाठी आम्हाला चुका सुधारताना खेळ उंचवावा लागेल, असे त्याने सांगितले.
नऊपैकी सात सामन्यांत पराभव
गॅबा खेळपट्टी इंग्लिश संघासाठी धोकादायक ठरली आहे. येथे खेळलेल्या नऊ सामन्यांतील त्यांचा हा सातवा पराभव आहे.