Saturday, July 13, 2024
Homeअध्यात्मयोगियांचे योगी

योगियांचे योगी

सिंधुदुर्ग जिल्हा ही अध्यात्माची भूमी. या भूमीत अनेक संत, महंत, तपस्वी होऊन गेलेत. माणगावचे प.पू. टेंबे स्वामी महाराज, कुडाळ पिंगुळीचे प.पू. राऊळ महाराज, सावंतवाडी दाणोलीचे प.पू. साटम महाराज यांच्याप्रमाणेच कणकवलीचे प.पू. भालचंद्र महाराज यांनी आध्यात्म रुजविला. समाजाला नवी दिशा दिली. पद्मनाभ हनुमंत पाटील यांनी लिहिलेल्या ‘योगियांचे योगी’ या प.पू. भालचंद्र बाबांच्या जीवनचरित्राचा आधार घेऊन ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

प्रभू परशुरामाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण परिसरात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात पाया नावाचे एक लहानसे गाव आहे. त्या गावात परशुराम ठाकूर नावाचे एक कुडाळ देशस्थ ब्राह्मण राहात असत. त्यांना ८ जानेवारी १९०४ रोजी मुलगा झाला. त्या तेज:पुंज बालकाचे नाव भालचंद्र असे ठेवण्यात आले. वास्तविक ठाकूर हे मूळ वेंगुर्ले तालुक्यातील मु. म्हापण गावचे रहिवासी होत. त्यांचा मूळ पुरुष महान शिवभक्त होता. सुमारे २०० वर्षांपूर्वी सदाशिव नावाचा सदाचरसंपन्न असलेला शिवभक्त रोज आडवे गंध कपाळाला लावीत असे. त्याने आपले सारे आयुष्य अशा व्रतांत व महान शिवभक्तीत घालविले आणि शेवटी तो सद्गतीस गेला. अशा त्या साक्षात्कारी महापुरुषाच्या वंशातीलच परशुराम ठाकूर हे होत. ते परमेश्वराचे पूजक असल्याने आपली नोकरी अगदी प्रामाणिकपणे सांभाळीत असत.

बाल भालचंद्र हा उपजतच परमेश्वराचा भक्त होता. तो शेजारच्या मुलांबरोबर लहान-लहान दगड गोळा करून त्यांच्यावर फुले वाहून त्यांची पूजा करीत असे. बोबड्या बोलानी भजन करीत असे. कारण त्याच्या कोवळ्या मनावर घरातील सुसंस्काराची आणि आचार धर्माची चांगलीच छाप पडली होती. भालचंद्र पाच-सहा वर्षांचा असताना त्याच्यावर जणू दु:खाचा कडाच कोसळल्यासारखा झाले. त्याचे आई-वडील लागोपाठ चार-दोन वर्षांत स्वर्गवासी झाले. भालचंद्र बालवयातच पोरका झाला. त्यावेळी तो पहिलीच्या वर्गात शिकत होता. त्या चिमण्या बालकाला आपल्या मातापिता वियोगाचे अतिशय दु:ख झाले. अशा घोर परिस्थितीत त्याच्या चुलत चुलत्याने त्याला गावी मु. म्हापण येथे आणले व तिथल्या प्राथमिक शाळेत त्याला दाखल केले.

मातृभाषेचे शिक्षण गावात पुरे झाल्याने आंग्ल शिक्षणासाठी त्याची रवानगी पुन्हा मुंबईला झाली. मु. वसईला त्याची मावशी राहात असे. तिच्याजवळ राहून वाघ हायस्कूलमध्ये तो मॅट्रिकपर्यंत शिकला. तो विद्यार्थीदशेत असताना ‘मानवता’ हा जगातील एक थोर धर्म जो समजला जातो त्यांची पाळे त्याच्या पवित्र हृदयांत फार खोलवर रुतली होती आणि त्या अशा थोर गुणामुळे तो त्यावेळी फार लोकप्रिय झाला होता. एक सुसंस्कारी व आदर्श विद्यार्थी अशी त्याची अखंड वसईत ख्याती झाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -