अहमदनगर : सध्या झी मराठी चॅनेलवर लोकप्रिय असलेल्या चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे व चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांच्या सुंदर अभिनयाने नटलेला विनोदी मराठी चित्रपट लग्नाचे वळू या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा शुभारंभ शहरातील सावेडीमध्ये नुकताच संपन्न झाला. निर्माते दादासाहेब जगताप यांची ही धमाल निर्मिती असून विजय सरोदे व उद्योजक सुहास बाठे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. सन इंडिया फिल्म्स मार्फत हा चित्रपट तयार होत आहे, अशी माहिती निर्माते दादासाहेब जगताप यांनी दिली.
समाजात सध्या चालू असलेल्या परिस्थितीवर,लग्न जमविण्याच्या पारं परिक पद्धतीवर व नवरदेव-नवरी निवडीच्या हट्टापायी संबंधित कुटुंबाची होणारी घुसमट व अडथळा, होणारा त्रास, मुला-मुलींचे कॉलेज जीवनातील प्रसंग, मुला-मुलींच्या आवडी-निवडीमुळे होणारा विलंब प्रचंड समाजविघातक ठरत आहे. या ज्वलंत प्रश्नावर होणा-या विविध सामाजिक अडथळ्यांवर तसेच लग्नाच्या तरुण मुला-मुलींचे होणारे हाल व सामाजिक अडचण या चित्रपटातून धमाल विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. या वृत्तीस आळा बसण्यासाठी एक पूर्ण विनोदाने भरलेली कलाकृती लग्नाचे वळू या नावाने सादर होत आहे, असे निर्माते जगताप यांनी सांगितले.