योद्ध्याच्या निधनाने देश हळहळला

Share

अनेक क्षेत्रांमध्ये भारताने नाव कमावलेले असताना तसेच भारत, रशिया, जर्मनी, फ्रान्स यांसारख्या अनेक प्रमुख देशांसोबत असलेले मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध अधिक दृढ होत असताना आणि देशाचे लष्करी सामर्थ्य बळकट होऊन जगभरात दबदबा निर्माण झालेला असताना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अर्थात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने देशावर फार मोठा आघात झाला आहे. भारतीय संरक्षण दलासाठी ही कधीही भरून न येणारी हानी असून या दुर्घटनेने सारेच नि:शब्द झाले आहेत. तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात रावत, त्यांची पत्नी व अन्य ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. त्यासोबतच अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यात नवीन संरक्षण दल प्रमुखांची नियुक्ती होईपर्यंत या पदाचा कार्यभार तात्पुरता कुणाकडे दिला जाणार की, अन्य काही पर्याय आहेत, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

बिपीन रावत हे बुधवारी सकाळी ८.४७ वाजता दिल्ली विमानतळ येथून विशेष विमानाने सुलूर येथे पोहोचले होते. तिथे ११.३४ वाजता पोहोचल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या ‘एमआय १७’ या हेलिकॉप्टरने ते वेलिंग्टनकडे निघाले. वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. त्यात ते लेक्चर देणार होते, मात्र ११.४८ वाजता सुलूर येथून निघाल्यानंतर १२.२२ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त आले. कुन्नूरमध्ये दुर्घटना घडली त्या भागात दाट धुकं होतं. कमी दृश्यमानतेमुळे ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दाट जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत रावत हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे पहिले वृत्त आले तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते, नंतर थोड्या वेळात त्यांच्या निधनाचे वृत्त आले आणि सारा देश शोकसागरात बुडून गेला.

संरक्षण दलासाठी हा मोठा आघात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण होते त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश आहे. दुर्घटनेत शौर्यचक्र विजेते भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या चौकशीसाठी हवाई दलाचे एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह लष्कराच्या सर्व अधिकाऱ्यांवर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हेलिकॉप्टरच्या क्रू मेंबरपैकी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकमेव बचावले आहेत. वरुण यांना याच वर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र सन्मान देण्यात आला होता. वरुण यांच्यासाठी सारा देश प्रार्थना करत आहे. या दुर्घटनेबाबत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले गेले आहेत. हा अपघात झाल्यानंतर रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि अन्य ११ मृतांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दिल्लीत आणले जात असताना एक दुर्दैवी घटना घडली. वेलिंग्टन येथून मद्रास रेजिमेंटल सेंटर येथे पार्थिव आणण्यात आले व तिथून ते सुलूर एअरबेस येथे नेण्यात येत असतानाच ताफ्यातील एका अॅम्ब्युलन्सला मेट्टूपलयम येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अॅम्ब्युलन्स रस्त्याच्या कडेला जाऊन संरक्षक भिंतीवर आदळली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही. बिपीन रावत यांच्या निधनाने संरक्षण दलप्रमुख पद रिक्त झाले आहे. संरक्षणविषयक उच्चस्तरिय समिती हे नाव निश्चित करेल व सरकारकडे शिफारस करेल. त्यामुळेच या महत्त्वाच्या पदाचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी तातडीने पावले टाकली जातील. याच अनुषंगाने सरकार पातळीवरही बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. बिपीन रावत हे २०१६ साली लष्करप्रमुख झाले. त्यांच्याकडे २०२० मध्ये संरक्षण दलप्रमुख पदाची धुरा देण्यात आली होती. ते देशाचे पहिले संरक्षण दलप्रमुख ठरले. केंद्र सरकारने २०१९ मध्ये संरक्षण दलप्रमुख हे पद निर्माण केले. तेव्हाचे लष्करप्रमुख असलेल्या बिपीन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी देशाचे पहिले संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. संरक्षण दलप्रमुख म्हणून आणि त्याआधी लष्करप्रमुख पदावर असताना रावत यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची ऑपरेशन्स झाली. रावत हे डिसेंबर १९७८ मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले ‘बेस्ट कॅडेट’ ठरले होते.

रावत यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन इंजिन असलेले ‘एमआय १७’ हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जाते, पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचे आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरले जाते. त्यामुळे यापुढे ‘मिग’ बरोबरच या हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेबाबत काटेकोरपणे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण देशाच्या सैन्यदलांच्या प्रमुखाचे लष्करी हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत निधन होणे ही बाब जगात महाशक्ती बनू पाहणाऱ्या भारतासारख्या देशासाठी नक्कीच शोभणारी नाही, त्यामुळे अशा गोष्टी कशा घडणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Tags: army

Recent Posts

मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली; पण खरंच अतिक्रमण झालेल्या मुंबईतील ११ तलावांचे पुनरुज्जीवन होईल?

मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…

1 hour ago

Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने धर्म बदलून केला ‘या’ धर्माचा स्वीकार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…

1 hour ago

धक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार? आणि मृत्यूचे मोल कोण मोजणार?

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…

2 hours ago

चर्चकडून पगार न घेणारे, पाच लक्झरी कारसह १३७ कोटींच्या संपत्तीचे मालक होते पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…

2 hours ago

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

2 hours ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

3 hours ago