Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीएसटी संपामुळे स्थानकांतील विक्रेत्यांचा आवाज ‘बसला’

एसटी संपामुळे स्थानकांतील विक्रेत्यांचा आवाज ‘बसला’

टपरीवाले, रसवंती चालक, दुकानदारांवर उपासमारीची वेळ;

गौसखान पठाण

गेल्या महिनाभरापासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी स्थानकांमधील प्रवाशांची रेलचेल पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे स्थानकांतील शेकडो फिरते विक्रेते, टपरीवाले, रसवंती चालक व दुकानदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आधी लॉकडाऊन आणि आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप अशा भीषण परिस्थितीत उदरनिर्वाह कसा चालवावा, हा प्रश्न या सर्वांसमोर निर्माण झाला आहे.

पाणी बाटली, कोल्ड्रिंक्स पासून वेफर्स, चिक्की, वडापाव आणि फळ विक्रेते आदींचा स्थानकांतील आवाज पूर्णपणे ‘बसला’ आहे. जिल्ह्यात पनवेल, पेण, रामवाडी, अलिबाग, कर्जत, खोपोली, श्रीवर्धन, माणगाव, इंदापूर, पोलादपूर व महाड आदी बस स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या एसटी बसेसची ये – जा सुरू असते. इतरही स्थानकांत ती पहायला मिळते. स्थानकांत येणारे प्रवाशी हेच या फिरते विक्रेते, छोटेमोठे हॉटेल चालक, भाजी विक्रेत्या, टपरीवाले व दुकानदारांचे हक्काचे ग्राहक असतात. मात्र स्थानकांत बसगाड्याच येत नाहीत म्हंटल्यावर प्रवाशी तरी कुठून येणार? परिणामी हे व्यावसाईक पुरते हतबल झाले आहेत. फिरते विक्रेते तर हाताला मिळेल ते काम करत आहेत. रमेश या फिरत्या विक्रेत्याने सांगितले की दिवसभर बसमध्ये खाद्य पदार्थ विकून मिळालेल्या तुटपुंज्या पैशांवर घर चालवत होतो. मात्र, संपामुळे हे काम पूर्णपणे थांबले आहे. जवळपास वर्षभर लॉकडाऊनमुळे हे काम ठप्प होते. आता कुठे बसेस सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळाले होते. त्यामुळे बरे चालले होते. मात्र काही दिवसांतच एसटीचा संप सुरू झाला आणि हातचे काम पुन्हा गेले. काय करावे कळत नाही. अशीच परिस्थिती इतरही अनेक स्थानकांतील शेकडो फिरत्या विक्रेत्यांची आहे. या असंघटित विक्रेत्यांना ना कोणता आधार आहे ना कोणती मदत. अनेक दुकानदारांनी आगाऊ माल भरून ठेवला आहे. त्यातील बरेचसे खाद्य पदार्थ आहेत. त्यांची मुदतही संपली आहे. तर काही माल खराब झाला आहे. त्यामुळे हे दुकानदार तोट्यात आहेत. एकूणच एसटी संपामुळे इतरही आर्थिक व्यवहार डबघाईला आले आहेत.

वडिलांचे बस स्थानकात छोटे दुकान आहे. महिनाभरापासून एसटीचा संप असल्याने खूप नुकसान झाले आहे. दुकानाचे भाडे देखील भरावे लागते. दुकान दिवसभर उघडे ठेवूनही ग्राहक फिरकत नाहीत. कारण स्थानकातच कोणी येतच नाही. योग्य तोडगा निघून लवकर एसटीचा संप मिटला पाहिजे.
हेमंत राऊत, व्यवसाईक, पाली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -