मुंबई : खासदार संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकदा पोलिसांच्या गराड्यातून बाहेर निघून उभे राहावे, मग भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला इंगा दाखवतील, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांना दिले आहे. राणे यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका करताना महिला अत्याचारावरून शिवसेनेलादेखील त्यांनी सुनावले आहे.
राऊतांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरू मानू नये आणि बोलू नये, असेही राणे म्हणाले. राऊत यांनी हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम राहावे आणि पोलिसांचा गराडा बाजूला करावा, मग जीभ कशी वापरायची हे भाजपचा कार्यकर्ता त्यांना दाखवून देईल, असा इशारा देताच राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्वत:चा गुरू म्हणवून घेऊ नये. राऊत ज्या प्रकारची विधाने करतात, त्यावरून त्यांच्या जिभेवर संशोधन व्हायला हवे. संजय राऊत यांच्या जिभेला हाड असेल आणि त्यांच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर त्यांनी पोलिसांच्या गराड्यातून बाहेर येऊन दाखवावे, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, विरोधकांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपने केली होती. त्यानुसार भाजप नगरसेवकांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.