नवी दिल्ली : तामिळनाडूच्या कुन्नूर येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी हवाई दलानं ट्राय सर्विस कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीची स्थापना केली आहे. ही चौकशी समिती हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या कारणांचाही शोध घेणार आहे. हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
हवाई दलाने आपल्या ट्विटर हँडलमध्ये नमूद केले की, ही चौकशी जलद गतीने करण्यात येणार आहे. तसेच अपघाताची कारणे आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचाही प्रयत्न असणार आहे. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत मृतांचा पूर्ण सन्मान राखला जावा आणि कोणतीही चुकीची माहिती किंवा अनुमान करणे टाळावे, असे आवाहन हवाई दलाच्या वतीने करण्यात आलेय.
लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर बुधवारी कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या आर्मी बेस कॅम्प परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे व्याख्यान नियोजित होते. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. दोन इंजिन असलेले एमआय-17 व्ही 5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानले जाते. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरले जाते.