Friday, July 19, 2024
Homeदेशबिपिन रावत अनंतात विलिन

बिपिन रावत अनंतात विलिन

पती-पत्नीला एकाचवेळी निरोप

नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat Death) यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.

आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रावत यांना १७ तोफांची सलामी देत दिल्लीतील छावणी परिसरात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Bipin Rawat Last Rites) करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीला देखील अखेरचा निरोप देण्यात आला.

गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास रावत यांचे पार्थिव दिल्ली येथील पालम विमानतळावर आणण्यात आले. तेथे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

शुक्रवारी दुपारी ब्रार स्क्वेअर येथे बिपीन रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनरल रावत यांच्या मुलींनी सर्व अंत्यसंस्काराचे विधी करत त्यांना मुखाग्नी दिला आणि जनरल यांच्यासह त्यांच्या पत्नी अनंतात विलीन झाल्या. या दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या इतर सैन्यदल अधिकाऱ्यांवरही त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जनरल रावत यांची आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांची अंत्ययात्रा सुरू झाली तो क्षण अंगावर काटा आणणारा होता. गन कॅरिएजमधून त्यांचे पार्थिव अंतिम स्थानी नेण्यात आले.

आर्मी बँडच्या धूनने जनरल रावत यांना आदरांजली देण्यात आली. तर, सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी करत या वीर पुत्रास अखेरचा निरोप दिला.

सलामी शस्त्र, बँड, पथसंचलन या सर्व गोष्टींचा आणि १७ तोफांच्या सलामीचा मान यावेळी जनरल रावत यांना देण्यात आला.

तिरंग्यामध्ये असणारे त्यांचे पार्थिव देशसेवा सार्थकी लागल्याचीच अनुभूती सर्वांना देत होते. त्याचवेळी एका पर्वाचा असा दुर्दैवी अंत होणं ही भावना सर्वांच्या काळजाला पाझर फोडत होती. देशप्रेमाचे एक वेगळे रूप यावेळी पाहायला मिळाले. अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनीही यावेळी जनरल रावत यांना आदरांजली वाहत पुष्पचक्र अर्पण केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -