चला लवकर, आटपा’. आईचा धोशा लागला होता. कितीतरी दिवसांनी काहीतरी कार्यक्रम होत होता. समारंभासाठी असणारी निमंत्रितांच्या संख्येची अट जरा शिथिल झाली होती. त्याचमुळे आरोहीच्या दुसऱ्या वाढदिवसाला समारंभ करणं शक्य झालं होतं. पहिला वाढदिवस तर लॉकडाऊनमध्ये आला आणि तसाच गेला. त्यामुळे आज आरोहीची मावशी, मामा, आजी-आजोबा सगळे तय्यार होऊन निघत होते. रती मावशीची तयारी काही पूर्ण होत नव्हती. ‘कशाला इतका नट्टा-फट्टा? सगळं करून शेवटी तोंडाला बांधायचाय पट्टा’, आई म्हणाली. मात्र तरीही रतीने मेकअप आवरता घेतला नाहीच. समारंभात मिरवायची हौस कितीतरी दिवसांनी पुरवता येणार होती.
सौंदर्य खुलविण्याच्या विविध तऱ्हांमध्ये खरोखर सतत बदल होताना दिसतात. हेच पाहा ना, मास्क लावणे बंधनकारक झाल्यावर किती प्रकारचे मास्क आले बाजारात? नवीन ड्रेस / शर्ट / कुर्ता घ्यायला गेलात, तर त्याला मॅचिंग मास्क असतोय ना, त्यासोबतच ठेवलेला. लहान मुलांसाठी कार्टूनमधली चित्रे असणारे आणि सणा-समारंभात भरजरी असे ही मास्क आलेत. हे सगळे तुम्ही सुंदर दिसावेत, तुमचा मूड आणि समारंभातला वावर आकर्षक व्हावा (आणि व्यवसायही छान चालू राहावा) म्हणून. खरं तर, नव्याने येणारे जवळजवळ सगळे बदल – कपड्यांची फॅशन असो, विविधरंगी केस असोत की, आरोग्य रक्षण असो, हे बदल उत्पादकांकडून सामान्य ग्राहकांच्या गळी उतरविले जात असतात. ग्राहकांनी सतत काही ना काही तरी विकत घ्यावे, हा एकमेव हेतू त्यामागे असतो, त्याने सुंदर दिसावे, यशस्वी व्हावे, निरोगी राहावे, हे आपले जाहिरातीसाठी.
शिवाय सुंदर म्हणजे कसे, याचे जणू मापदंड सौंदर्य प्रसाधनाचे, कपडे, साड्या, पादत्राणे यांचे उत्पादक स्वतःच बनवितात. विशेषत: सौंदर्य प्रसाधने यात आघाडीवर असतात आणि सामान्य तरुण-तरुणीच नव्हे, तर अगदी आज्जी-आजोबासुद्धा त्याला बळी पडतात. पाहा जरा आजूबाजूला नीट, सहज ध्यानात येईल.
काय दावे करतात हे उत्पादक?
वैयक्तिक काळजीशी निगडित उत्पादनांवरील दावे (दन्तमंजन, सौंदर्यप्रसाधने, निर्जंतुकीकरण इ.)
– जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या क्रमवारीचा किंवा मोठेपणाचा दावा.
– समस्या निर्मूलनाचा शंभर टक्के दावा/खात्री – इम्युनिटी हा सध्याचा परवलीचा शब्द.
– उत्पादनात अत्यल्प प्रमाणात असणाऱ्या घटक पदार्थावर प्रामुख्याने प्रकाशझोत टाकणे (उदाहरणार्थ बदाम, केशर, व्हिटॅमिन ई, सोने-चांदी)
– उजळ कांती, सुरकुत्या नाहीशा होणे, केसगळती थांबणे, त्वरित शक्ती येणे इ इ.
उत्पादकांतील जीवघेण्या स्पर्धेमुळे कुठलाही विधिनिषेध न बाळगता ग्राहकाला आपल्याकडे आकर्षून / खेचून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या, दिशाभूल करण्याऱ्या खोट्या अतिरंजित जाहिरातींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच प्रत्येक सण आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांकडे इव्हेंट म्हणून बघण्याची वृत्ती. आपण कसे आहोत, यापेक्षा कसे दिसायला हवे याकडे दिलेले लक्ष आणि दिसण्याला आलेले अवास्तव महत्त्व, यामुळे अनेक स्त्री-पुरुष झटपट परिणामाच्या दाव्याला बळी पडतात. या दाव्यांना बळी पडण्यापेक्षा आव्हान देणे, त्यासाठी आस्कीकडे (ASCI) तक्रार करणे महत्त्वाचे आहे. पण तसे करणारे ग्राहक हाताच्या बोटावर मोजण्याइतके.
निदान उत्पादनावरील माहिती नीट वाचून, समजून घेण्याकडे तरी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे, म्हणजे स्वत:साठी काय योग्य तेच वापरले जाईल. उदा., केस रंगविण्यासाठी प्रथमच आणलेले उत्पादन अगर चेहेऱ्यावर लावायचे क्रीम, लोशन इत्यादीवर असे स्पष्ट लिहिलेले असते की, अमुक एका पद्धतीने कानाच्या मागे हे लावा, अमुक इतके तास ठेवा, मग तिथली त्वचा कशी आहे ते पाहा, लावल्यावर आग / जळजळ झाली, तर लगेच धुवा इ.इ. पण झट की पट, अगदी जाहिरातीतल्यासारखे छान दिसण्याची घाई, मित्र-मैत्रिणींचा सल्ला / अनुभव, आपण असे प्रसाधन वापरतो हे दडविण्याची किंवा मिरवण्याची इच्छा, अशा विविध कारणांमुळे करायला गेलो एक, असा अनुभव वाट्याला येतो. ‘कसे वापरावे’ हे काळजीपूर्वक वाचले नाही आणि त्रास झाला, तर उत्पादक तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. त्याच्या खोक्यावरच्या सूचनांचे पालन केले गेले नाहीये, हे कारण महत्त्वाचे ठरते. ग्राहकाचा उत्पादनाची माहिती मिळण्याचा हक्क सांभाळला जावा, म्हणून विविध उत्पादनांवर काय माहिती द्यायला हवी, याचे नियम बनविले गेले आहेत. मग ते खाद्यपदार्थ असोत, औषधे वा सौंदर्य प्रसाधने असोत अगर विजेची उत्पादने असोत. पण ग्राहक जर ती माहिती वाचत नसेल आणि जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे थेट चेहेऱ्यावरच किंवा केसांवरच प्रयोग करून अमुक तमुक हीरोसारखा दिसण्यासाठी आतुर होत असेल, तर काय करणार?
म्हणून उत्पादकाने प्रत्यक्ष उत्पादनाबरोबर दिलेली माहिती वाचाल (आणि त्याबरहुकूम कराल) तर वाचाल!
mgpshikshan@gmail.com
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…