विलास खानोलकर
साईबाबांचा एक भक्त मुळेशास्त्री एकदा गोपाळ बुट्टीसमवेत साईंच्या दर्शनास गेले होते. ते सोवळे पाळत असल्याने त्यांनी बाबांचे दुरुनच दर्शन घेतले. तेव्हा बाबांनी त्यांना त्यांच्या पूर्वीच समाधिस्थ झालेल्या घोलप गुरुजींच्या स्वरूपात दर्शन दिले. त्यांनी बाबांचे चरण धरले. अशा प्रकारे बाबांनी त्यांच्या मनातील शंका घालवली. एकदा ठाण्याच्या साईभक्त चोळकरांनी बाबांना मला नोकरी मिळाल्यास मी तुम्हाला खडीसाखरेचा प्रसाद अर्पण करीन असा नवस केला होता. त्यानंतर साईबाबांच्या कृपेने त्यांना नोकरीही लागली. पण काही कारणाने नवस फेडण्यास विलंब झाला म्हणून त्यांनी साखर खाणेच सोडून दिले. चहापण कोरा पिऊ लागले. पुढे काही दिवसांनी ते बाबांच्या दर्शनास गेले व आपला नवस फेडला. तेव्हा बाबा तेथे असलेल्या भक्त जोगांना हसून म्हणाले, जोग तुम्ही यांना भरपूर साखरेचा चहा पाजा, तेव्हा चोळकरांना श्रीबाबा अंतर्ज्ञानी असल्याची ओळख पटली व त्यांनी साईना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून नमस्कार केला.
साईचे सहज बोलणे, सहज चालणे,
बोले तैसा चाले हेच संताचे वागणे
प्रेमळ भक्तांचे ते आनंदी चांदणे
प्रेम त्यांचे जणू हृदयात गोंदणे।। १।।
साईलीला अद्भुत अनंत अगाध
वागणे साधे त्यात फुलांचा सुगंध
श्रवण पठण आनंद अतिमोद
अवघा गोड सारा जगभर सुगंध ।। २।।
प्रेमळ कृपासिद्ध साई महान संत
अवतार सारा जणू प्रसिद्ध संत
कित्येक वर्ष प्रचिती संथ संथ
भक्तकार्य चालविले महान महंत ।। ३।।
अनेकांना प्रेमभरे उपदेशिले
शेकडोंना महान संकटी रक्षिले
हजारोंना प्रेमभरे अभय दिधले
केले सुखी देऊन त्यांच्या मनातले ।। ४।।
दुःखितांचे अश्रू अनावर पुसले
व्याधिग्रस्तांचे रोग दूर केले
अनेकांना चांगल्या मार्गी नेले
उद्धरुनी अनेका पैलतिरी नेले ।। ५।।
केले अव्याहत जनकल्याण
घेतला त्यासाठीच जन्म
साई होऊन आई आजन्म
राहिले शिर्डीत शत जन्म ।। ६।।
शिर्डी साईंचे गाव अतिपावन
भंडाऱ्यात गरिबा मिळाले घावन
आशीर्वाद दिला साऱ्या भक्तजण
अन्नपूर्णा देवी राहील प्रसन्न ।। ७।।
असे प्रेमळ सद्गुरू साईनाथ
शके अठराशे चाळिसात
साधुनी दसऱ्याचा मुहूर्त
समाधिस्त झाले स्वर्गलोकांत ।। ८।।
सोपा मंत्र साईनाथांचा
मार्ग सुखकर करेल भक्तांचा
शांती-समता श्रद्धासबुरीचा
जो पाळेल सुखी मार्ग त्याचा ।। ९।।
सदा निष्ठा असावी साईचरणी
लीन व्हावे ईश्वरचरणी
राग, लोभ, मोह त्यागूनी
शतजन्म साई सांभाळेल,
प्रसन्न होऊनी ।। १०।।