मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने कोविड-१९ विषाणूच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सींग करणाऱ्या पाचव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. यात २२१ नमुन्यांपैकी केवळ २ रुग्ण ओमायक्रॉनचे आढळले आहेत; तर डेल्टा व्हेरिएंटचे ११ टक्के आणि डेल्टा डेरिव्हेटीव्हचे ८९ टक्के रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे २२१पैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
महापालिकेकडून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सींग करणाऱ्या म्हणजे जनुकीय सूत्र निर्धारण करणाऱ्या चाचण्या नियमित केल्या जातात. त्यानुसार पाचव्या चाचणीमध्ये मुंबईतील २२१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात डेल्टा व्हेरिएंटचे ११ टक्के तर डेल्टा डेरिव्हेटीव्हचे ८९ टक्के रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचे फक्त २ रुग्ण आढळले आहेत.
मुंबईतील २२१ रुग्णांपैकी १९ रुग्ण हे ० ते २० वर्षाखालील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटातील ६९ रुग्ण, ४१ ते ६० वर्षे वयोगटातील ७३ रूग्ण , ६१ ते ८० वयोगटातील ५४ रुग्ण आणि ८१ ते १०० वयोगटातील ६ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे एकूण २२१ रुग्णांपैकी, वय वर्षे १८ पेक्षा कमी वयोगटामध्ये १३ जण आहेत. यापैकी २ जणांना ‘डेल्टा व्हेरिएंट’ आणि ११ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकाराच्या कोविडची लागण झाल्याचे आढळले. म्हणजेच बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षावरून दिसते.
कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगाने केल्यामुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
लसवंतांना धोका कमी
२२१ नमुन्यांपैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या २६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ४७ पैकी १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले तर या २२१ पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
चाचण्या सुरूच
राज्यात आणि मुंबईत तूर्तास ओमायक्रॉनचा संसर्ग कमी असल्याचे दिसत आहे. मात्र चाचण्या सुरूच आहेत. खबरदारी म्हणून मुंबई किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. दरम्यान १ डिसेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत अति जोखीम व इतर देशातून आलेल्या प्रवाशांची संख्या ५२,९०४ इतकी आहे तर आरटीपीसीआर केलेल्या प्रवाशांची संख्या ९९४५ इतकी असून कोरोना बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी पाठवलेल्या प्रवाशांची संख्या १६ आहे.