देशातील आणि देशासमोरील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची तड लावण्यासाठी संसदेची अधिवेशने बोलावली जातात. यावेळी देशाच्या विविध राज्यांचे, केंद्रशासित प्रदेशांचे खासदार आपापल्या मतदारसंघांतील प्रश्न मांडतात. त्यावर सर्व बाजूंनी साधक-बाधक चर्चा केली जाते आणि ते प्रश्न सोडविले जातात. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा संसदेच्या अधिवेशनांना सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरच्या अशा सर्वच खासदारांनी उपस्थिती लावणे आणि आपल्या मतदारसंघांतील लोकांच्या समस्यांना वाचा फोडणे ही मोठी जबाबदारी असते. तसेच एखाद्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना साथ देणे आणि तो मुद्दा धसास लावणे किंवा सत्ताधाऱ्यांचा एखादा मुद्दा न पटल्यास तो हाणून पाडणे, अशा अनेक गोष्टी या लोकशाहीच्या मंदिरात घडत असतात. म्हणूनच या मंदिरात प्रत्येक खासदाराने हजेरी लावणे आणि आपल्या मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करून घेऊन त्यायोगे देशाच्या विकासाला माेलाचा हातभार लावणे, हे या लोकप्रतिनिधींचे आद्यकर्तव्यच आहे आणि ते त्यांनी पार पाडले पाहिजे, हे ओघाने आलेच.
देशापुढे सध्या कोरोना महामारी, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न असे कित्येक मुद्दे असून त्यावर संसदेच्या उभय सभागृहांत चर्चा होणे अगत्याचे आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू आहे. एकीकडे राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या १२ खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्ष आक्रमक बनला आहे. निलंबित खासदारांनी माफी मागितल्यास त्यांचे निलंबन मागे घेतले जाऊ शकते, पण खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ करत आहेत, त्यामुळे संसदेचे कामकाज विस्कळीत होत आहे. सभागृहाचे कामकाज ते रोखून धरत आहेत. अशा वेळी उपस्थित झालेल्या चर्चेत सहभागी होऊन, विरोधकांचा विरोध मोडून काढणे यासाठी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात सर्वशक्तिनिशी हजर राहणे गरजेचे असते. विरोधक आपला मुद्दा आक्रमकपणे लावून धरताना कामकाज रोखतात आणि सभात्यागही करतात. विरोधकांचे सभागृहातून सतत बाहेर निघून जाणे असमर्थनीय आहेच, पण सत्ताधारी बाकांवरील खासदारही जर अधिवेशनास गैरहजर राहिले अथवा कामकाज अर्धवट सोडून निघून जाऊ लागले, तर ते अशोभनीय असेच आहे.
अचानक सभागृहात एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर मतविभाजनाची मागणी झाली, तर सत्ताधाऱ्यांची मोठी पंचाईत होऊ शकते. या सर्व बाबी ध्यानी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत गैरहजर राहणाऱ्या भाजप खासदारांची खरडपट्टी काढली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि संसदेच्या या अधिवेशनास गैरहजर राहणाऱ्या आणि दांड्या मारणाऱ्या खासदारांवर पंतप्रधान मोदी हे चांगलेच संतापले. ‘खासदारांनी गैरहजर राहणे बंद करा आणि स्वतःत बदल घडवा. तुम्ही बदलला नाहीत, तर बदल घडायला वेळ लागणार नाही’, अशा कडक शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी दांडीबहाद्दर खासदारांचे कान उपटले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीत भाजपच्या संसदीय पक्षाची बैठकही झाली. या बैठकीस पंतप्रधान मोदी उपस्थित होते. जवळपास दोन तास ही बैठक चालली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी बैठकीत संसद खेळ स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्याचे आवाहन केले. त्यासोबत ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्यासोबत लाइव्ह कार्यक्रम करण्याचे आवाहनही केले असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली, अशा विविध कार्यक्रमांची आखणी सुरू असताना सर्वच खासदारांनी सभागृहांत हजर राहणे महत्त्वाचे आहे. हिवाळी अधिवेनाच्या सुरुवातीलाच भाजपने व्हीप बजावून लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांना अधिवेशन काळात उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. त्यानंतरही भाजप खासदार संसदेच्या अधिवेशनास दांड्या मारत असल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली.
त्यावरून पंतप्रधान मोदींनी संसदीय पक्षाच्या बैठकीत गैरहजर आणि दांड्या मारणाऱ्या खासदारांना सुनावले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भाजप खासदारांना रोज अधिवेशनासाठी संसदेत हजेरी लावण्यास सांगितले आहे. संसदेतील अधिवेशन आणि बैठकींना नेहमी उपस्थित राहा. मला वारंवार तुम्हाला लहान मुलांप्रमाणे हे सांगावे लागणे ही चांगली गोष्ट नाही, अशा शब्दांत त्यांनी या खासदारांचे कान टोचले आहेत. मुलांना सतत टोकले, तर त्यांना आवडत नाही. त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडवा अन्यथा बदल होतच असतात, असा इशारा संतप्त झालेल्या मोदींनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व खासदारांची संसदेच्या अधिवेशनातील उपस्थिती बंधनकारक असल्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी यावेळी दिले. देशाचा योग्य दिशेने आणि मार्गाने विकास साधायचा असेल, तर सर्व लोकप्रतिनिधींना अंगी शिस्त ही बाळगलीच पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपापल्या पक्षांच्या बैठका, चर्चा, शिबिरे यांना हजेरी लावणे हे अगत्याचे आहे. विशेष म्हणजे भाजप सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही तयारी करत आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबसारख्या राज्यांचा समावेश असल्याने भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. अशा स्थितीत आपल्याच पक्षाचे खासदार जर बैठकांना आणि अधिवेशनाला अनुपस्थित राहिले, तर ते योग्य ठरणार नाही. ही बाब ध्यानी घेऊन शिस्तप्रिय असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी दांडीबहाद्दरांचे कान उपटले हे चांगलेच झाले.