राजकोट (वृत्तसंस्था) : कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या धडाकेबाज नाबाद दीड शतकामुळे महाराष्ट्रने विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय नोंदवला. छत्तीसगडच्या २७६ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रने ८ विकेट आणि १८ चेंडू राखून सहज विजय मिळवला.
ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीचा धडाका कायम असून दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रला सहज विजय मिळवता आला. नाणेफेकीचा कौल जिंकून महाराष्ट्रने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. छत्तीसगडची सुरुवात अडखळत झाली. ६९ धावांवर त्यांचे ४ फलंदाज माघारी परतले होते. अमरदीप खरेच्या ८२ धावा आणि शशांक सिंगच्या ६३ धावांमुळे त्यांचा डाव सावरला. ५० षटकांत छत्तीसगडने ७ फलंदाजांच्या बदल्यात २७५ धावांपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राच्या संघाने धडाकेबाज सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि यश नहर या सलामीवीरांनी १२० धावांची भागीदारी करत महाराष्ट्राला चांगली सुरुवात करून दिली. यश बाद झाल्यानंतर नौशाद शेखने ऋतुराजला बरी साथ दिली. त्यामुळे छत्तीसगडला दुसरी विकेट मिळविण्यासाठी महाराष्ट्राच्या २१६ धावा होईपर्यंत वाट पहावी लागली. ऋतुराज धडाकेबाज फलंदाजी करत १४३ चेंडूंत नाबाद १५४ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रने ४७ षटकांत २७६ धावांचे लक्ष्य गाठले.