Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीनिर्मिती जिवंत रोबोंची!

निर्मिती जिवंत रोबोंची!

उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार

पृथ्वीवर जीवन कसं निर्माण झालं, याबद्दलचं कुतूहल मनुष्यजातीच्या अस्तित्वापासून आहे आणि एकविसाव्या शतकात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांनी भरघोस प्रगती केली तरीदेखील ते गूढ अजून पूर्णपणे उकललेलं नाही. ही एक अनाहत यात्रा आहे. आज हे सर्व लिहायचं कारण म्हणजे, अमेरिकेतल्या हार्वर्ड आणि व्हर्माऊंट तसेच टफ विश्वविद्यालयातल्या संशोधकांनी एक विलक्षण क्रांतिकारी शोध लावला आहे. तो म्हणजे, अर्धा बेडूक आणि सुपर कॉम्प्युटरने बनवलेला अर्धा जीव यांच्या माध्यमातून एका नव्या जीवाला जन्म घातला. एक जिवंत रोबो निर्माण केला! या आधीचे सगळे रोबो हे कृत्रिम होते. त्यानंतर आलेली डॉली मेंढी ही क्लोनिन पद्धतीने आली होती; परंतु आता जे घडतयं ती आर्टिफिशिअल इन्टिलिजन्समधली सर्वात मोठी क्रांती म्हणायला हवी.


गेली ६० वर्षं त्यावर संशोधन सुरू होतं. प्रथम हे सर्व स्वप्नवत वाटत होतं. मग त्याचं विचारात रूपांतर झालं. तो विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी शेकडो शास्त्रज्ञांनी हजारो प्रयोग केले आणि एक अत्यंत पथदर्शी असं संशोधन अलीकडेच प्रकाशित झालं आणि ते म्हणजे स्वनिर्मिती करू शकणारे रोबो. म्हणजे यापुढे रोबोज मुलं जन्माला घालू शकतील. या रोबोंना आतापर्यंत मशीनसारखा चेहरा होता. पण आता त्याला मानवी चेहरा देता येणार आहे. ही एखादी कल्पनारम्य सायन्सची वेब-सीरिज नाही अथवा हॉलिवूडचा गूढ विज्ञानपटही नाही, तर आता सुपर कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपल्यासारखा चेहरा-मोहरा असलेले लाखो जिवंत रोबो तयार करणं शक्य होणार आहे.


ठरावीक जीवजंतूपासून या आविष्काराची सुरुवात झाली आहे. त्याला झेनोबोट असं नाव आहे. एका जीवशास्त्रीय पेशीपासून अत्याधुनिक प्रयोगशाळेत त्याची निर्मिती करण्यात आली आणि या संशोधनाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं. अगदी माणसासारखे दिसणारे रोबो… दोन लाख डॉलर देऊन बिलकूल तुमच्यासारखा, तुमच्या आकाराचा, हाडामासाचा, हुबेहुब तुमचा आवाज असणारा जिवंत रोबो तयार करता येणार आहे!! आहे की नाही भन्नाट? संपूर्ण विज्ञानविश्वात या माहितीने मोठा थरार निर्माण झालाय. सोफियासारखे मनुष्यसदृष्य मशीन रोबो ओळखीचे झाले होते, पण आता जे होतंय ते जिवंत रोबोचं युग. महासंगणकाद्वारे जन्माला घातलेला या पृथ्वीवरचा पहिला जीव. स्वतःसारखीच निर्मिती स्वतःपासून करू शकणारा प्रयोगशाळेत बनलेला पहिला जीव. ज्ञानाची ही एक नवी शाखा निर्माण झाली आहे आणि त्या ज्ञानशाखेत जिवंत रोबोचं संशोधन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. मोबाइलचा शोध लागल्यानंतर अवघ्या २५-३० वर्षांमध्ये तो निम्म्या जगाच्या हातात खेळायला लागला, जीवनाचा अविभाज्य भाग बनला. मग यापुढे जिवंत रोबो हे आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग पुढच्या दोन-तीन दशकांत नसतील कशावरून?


हे कसं शक्य झालं, तर गर्भापासून स्टेमसेल वेगळे करून त्याची पूर्वनियोजित मांडणी ही प्रक्रिया अत्यंत किचकट जटिल आहे. शरीराचे विविध भाग, जसे की त्वचा, हृदय त्यातून निर्माण करून महासंगणकाद्वारे प्रोग्राम केलं गेलं. यासाठी लागणाऱ्या मूळ पेशी एका आफ्रिकन बेडकापासून घेण्यात आली. त्याचं कारण या प्रजातीच्या बेडकामध्ये पुनर्निर्मितीची क्षमता अफलातून आहे आणि ही पुनर्निर्मिती करताना तो बेडूक फक्त स्वतःच्या शरीराचाच वापर करतो. तुम्ही गर्भापासून स्टेमसेल विलग करता तेव्हा ती सेल वातावरणाशी जुळवून घेते आणि मग आपल्यासारखा जीव पुनरुत्पादित करते. शास्त्रज्ञांना हेच हवं होतं आणि म्हणून त्या बेडकाचा वापर केला गेला. या झेनोबोटचा आकार ‘सी’ या इंग्रजी अद्याक्षरासारखा आहे. गंमत म्हणजे महासंगणकाने हेच अद्याक्षर का निवडलं, तर १९८०च्या दशकातल्या ‘पॅक मॅन’ या व्हीडिओ गेममध्ये हा आकार खूप लोकप्रिय झाला होता. सॅम क्रेगमन, डगलस ब्लॅकिस्टन, मायकेल लेव्हीन आणि जोश बॉन्गार्ड या चार दिग्गज शास्त्रज्ञांनी झेनोबोट ३.०ची निर्मिती केली. मॉलिक्युलर बायोलॉजी आणि आर्टिफिशिअल इंटिलिजन्स याचा हा अप्रतिम आविष्कार. सेल एखादी गोष्ट हुबेहुब कॉपी करतात. त्याच्या आशयासकट आणि विघटित होऊन एक नवी रचना निर्माण करतात आणि हे सगळं एका महासंगणका आधारे पूर्वनियोजित सूचनेनुसार नियंत्रित केलं जातं. या प्रक्रियेला कायनॅमॅटिक सेल्फ रिप्लिकेशन असं नाव आहे. या संशोधनामुळे सध्या ही ज्ञानशाखा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.


मग हे जिवंत रोबोचं संशोधन वरदान की शाप? याचा हेतू काय? त्याने काय साध्य होणार? काही निर्माण होणार की त्यातून संहार होणार? मानवी जीवनासमोरचं पर्यावरण, असाध्य रोग यापासून या संशोधनामुळे मुक्ती मिळू शकेल का? आज हे संशोधन अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अखत्यारित आहे. त्याचा उपयोग विधायक कामांसाठीच होईल याची काय हमी? उद्या हे मानव विघातक शक्तींच्या हाती पडले तर? आज हा जिवंत रोबो प्रोग्राम्ड आहे. पण उद्या तो स्वतःच स्वतःचे निर्णय घेऊ लागला अन् हजारोंऐवजी करोडोंची पुनरुत्पादिता दाखवू लागला, तर भीषण प्रश्न निर्माण होतील. आताच या सगळ्यांचा सखोल विचार करणं गरजेचं आहे. एकीकडे अशा प्रकारचा जिवंत रोबो तुमच्या एकटेपणावर एक उत्तम उपाय असू शकतो. तितकाच तो विघातकही असू शकतो. जसं हा जिवंत रोबो तुम्हाला हवं ते घरकाम करू शकतो, तसाच तुमच्यावर पाळतही ठेवू शकतो. त्यामुळे या नव्या जीवजग निर्मितीबद्दल, त्यातून उद्भवणाऱ्या नीतिमत्तेच्या प्रश्नांबद्दल बोलायला हवं. मोबाइल आला आणि त्यातून आलेल्या सोशल मीडियाच्या सहाय्यानं आज देशाची सरकारं कोसळू शकतात. अफवा पसरवू शकतात. दंगली घडवल्या जाऊ शकतात. तसंच जिवंत रोबोच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचं विश्व उद्या येणार आहे, याचा विचारच केलेला बरा.


या जिवंत रोबोंना कशा प्रकारच्या भावभावना असतील? त्यांना आवडणारं संगीत कुठलं असेल? ते कोणत्या प्रकारच्या साहित्याचा आस्वाद घेतील? ज्ञान मिळवण्याच्या त्यांच्या पद्धती कशा असतील? आठ तास काम केल्यानंतर त्यांना आपल्यासारखा थकवा येईल की, ते आर्टिफिशियल रोबोसारखं २४ तास काम करू शकतील? जन्मतःच जर विशेष गुण शरीररचना घेऊन हे जिवंत रोबो आमच्या स्पर्धेत आले, तर आपला काय पाड लागणार… एकत्र गुण्यागोविंदानं नांदणार की एकमेकांचं विनाश करणार… समोर आलेली व्यक्ती जिवंत रोबो आहे हे कसं ओळखणार? असे हजारोंनी जिवंत रोबोज निर्माण झाले, तर आताच्या बेरोजगारीचं काय होईल? असमानता पसरेल त्याचं काय? ज्या देशात असे जिवंत रोबो निर्माण होतील त्यांचं नागरिकत्व कोणत्या देशाचं? मानव जशा चुका करतात तशा चुका जिवंत रोबोंनी केल्या, तर त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतील. अशा जिवंत रोबोंच्या सुरक्षिततेचे आणि त्यांच्यापासूनच्या सुरक्षिततेचे कोणते उपाय असतील, हेही पाहावं लागेल. आमच्या मनात जसे पूर्वग्रह असतात, अनुभव असतात, श्रद्धा असतात, तशाच त्या जिवंत रोबोंमध्येही असणार का? आणि मग या संपूर्ण व्यवस्थेवर माणसांचं नियंत्रण असेल की जिवंत रोबोंचं, हाही प्रश्न असेल…

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -