
ब्रिस्बेन (वृत्तसंस्था) : ट्रॅव्हिस हेडचे (खेळत आहे ११२) नाबाद शतक आणि डेविड वॉर्नर (९४ धावा), मार्नस लॅबुशेन (७४ धावा) यांची अर्धशतके या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवले. पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी गाजवला तर गुरुवारच्या दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३४३ धावांचा डोंगर उभारत १९६ धावांची मोठी आघाडी घेतली.
गोलंदाजांप्रमाणे फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान देताना दुसरा दिवसही यजमानांच्या नावे केला. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने पाहुण्या गोलंदाजांचा सुरेख समाचार घेत झटपट शतकाची नोंद केली. त्याच्या ९५ चेंडूंतील ११२ धावांच्या नाबाद खेळीत डझनभर चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्याच्यापूर्वी, सलामीवीर वॉर्नरने ९४ आणि वनडाऊन मॅर्नस लॅबुशेनने ७४ धावांचे योगदान दिले. वॉर्नर, हेड आणि लॅबुशेनने केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही तर एक शतकी आणि एक अर्धशतकी भागीदारी केली. मार्कस हॅरिस (३ धावा) लवकर बाद झाल्यानंतर अनुभवी वॉर्नरने लॅबुशेनसह (७४ धावा) दुसऱ्या विकेटसाठी १५६ धावांची मोठी भागीदारी केली. त्यानंतर माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथही (१२ धावा) निराशा केली. त्यातच कॅमेरॉन ग्रीनला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या सत्रावर थोडे इंग्लंडचे वर्चस्व राहिले.
त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने डावाची सूत्रे आपल्याकडे घेताना पदार्पण करणाऱ्या अलेक्स कॅरीसह (१२ धावा) सहाव्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्ससह (१२ धावा) सातव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचताना ऑस्ट्रेलियाचे त्रिशतक फलकावर लावले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, तासभर आधी इंग्लिश कर्णधार ज्यो रूटने भागीदारी संपुष्टात आणली.
मात्र, हेडने शतक पूर्ण करतानाच मिचेल स्टार्कसोबत आठव्या विकेटसाठी ३७ धावांची नाबाद भागीदारी रचताना पहिल्या डावातील एकूण आघाडी १९६ धावांवर नेली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ८४ षटकांत ७ बाद ३४३ धावा केल्या. हेड ११२ धावांवर तसेच मिचेल स्टार्क १० धावांवर खेळत आहे. इंग्लंडकडून मध्यमगती गोलंदाज ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी पावसामुळे जवळपास ४० षटकांचा खेळ वाया गेला तरी गुरुवारी ब्रिस्बेनमध्ये विना व्यत्यय ८४ षटकांचा खेळ झाला.