Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रमाथेरान प्रवेशद्वारावरून तीन परदेशी पर्यटकांना पाठवले परत

माथेरान प्रवेशद्वारावरून तीन परदेशी पर्यटकांना पाठवले परत

मुकुंद रांजाणे

माथेरान : माथेरान पर्यटन नगरीला कोरोना प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी माथेरान पालिकेने सक्तीची पावले उचलताना येथील प्रवेशद्वारावर वैद्यकीय तपासणी केंद्र सुरू केले असून ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेने येणाऱ्या सर्व पर्यटकांचे स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार तीन परदेशी पर्यटकांना शहरात प्रवेश न देता माघारी पाठवण्यात आले आहे.

दस्तुरी नाका येथील या स्क्रीनिंग कार्यपद्धतीमध्ये माथेरान पालिकेच्या पथकाला तीन पर्यटकांना माथेरान शहरात प्रवेश देता आला नाही. रविवारी ५ डिसेंबर रोजी माथेरानच्या दस्तुरी नाका येथे मुंबई येथून प्रवासी कारने तीन परदेशी पर्यटक आले. त्यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य पथकाने रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मागील दोन दिवसांतील कोविड १९ बाबतीतील आरटीपीसीआर टेस्ट केली असल्याबाबत टेस्टचा अहवाल मागण्यात आला. मात्र, २ डिसेंबरला रोजी जपानमधून मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या त्या तीन जपानी पर्यटकांकडे दोन दिवसांपूर्वीचा किंवा त्याआधीचा आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल नव्हता. मुंबईत तीन दिवस राहून हे पर्यटक माथेरान येथे आले होते.

या पर्यटकांना माथेरान पालिकेच्या आरोग्य पथकाने महाराष्ट्र शासन आणि रायगड जिल्हाधिकारी यांची ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आलेली नियमावली याची माहिती करून दिली. तसेच, शासन आदेशही दाखवला. या तिन्ही जपानी पर्यटकांचे लसीकरण झाले होते आणि त्यांच्यामध्ये कोरोनासंबंधी कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नव्हती. तरीही आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल त्यांच्याकडे नसल्याने आम्ही त्या पर्यटकांना शहराची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन शहरात प्रवेश दिला नाही, अशी माहिती माथेरान पालिकेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि पालिका मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी दिली आहे.

त्याचवेळी शासनाचे नवीन आदेश येईपर्यंत माथेरानमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचे स्क्रीनिंग केले जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी भणगे यांनी दिली. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथे अलर्ट असलेल्या माथेरान पालिकेच्या पथकामुळे माथेरानमध्ये परदेशातून आलेले तीन पर्यटक प्रवेश करू शकले नाहीत.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यास माथेरानमधील सर्व व्यवहार ठप्प होत असतात व येथील नागरिक बेरोजगार होत आल्याने त्याचा मोठा फटका संपूर्ण शहराला बसला होता. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. – प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

माथेरान पालिकेने शक्य तेवढ्या सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्यापासून माथेरानमध्ये हा संसर्ग पसरू नये, यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. – सुरेखा भणगे-शिंदे, मुख्याधिकारी, माथेरान

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -