Sunday, August 24, 2025

परदेशातून आलेले चार जण बेपत्ता झाल्याने औरंगाबादकरांचे टेन्शन वाढले!

औरंगाबाद : ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग सुरू झाल्यानंतर औरंगाबाद शहरात एक डिसेंबरपासून ११४ नागरिक विदेशातून आले. त्यांच्यापैकी एकशे दहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर चार जणांचा संपर्क अद्याप झाला नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. यामुळे औरंगाबादकरांचे टेन्शन वाढले आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारने सर्व जिल्हा प्रशासनांना व महापालिका प्रशासनांना सकर्त राहण्याचा इशारा दिला आहे. यानुसार, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. पहिली चाचणी झाल्यानंतर सात दिवसांनी दुसरी चाचणी केली जात आहे. दरम्यानच्या, काळात त्या व्यक्तीला विलगीकरणात राहण्याची सक्ती केली जात आहे.

पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार १ ते ५ डिसेंबर दरम्यान औरंगाबाद शहरात विदेशातून ११४ व्यक्ती आल्या. त्यांच्या पैकी ११० व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली या सर्वांच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चार व्यक्तींचा शोध लागत नाही. त्यांचे फोन नंबर बंद लागतात, पत्ताही सापडत नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची धास्ती घेतली आहे. सध्या औरंगाबाद शहरात या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून मेल्ट्रॉनसह पदमपुरा येथील ‘ईओसी सेंटर’मध्ये ७५ खाटांचे सुसज्ज कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे नवीन व्हेरियंटचा एकदम धोका निर्माण झाला, तर तातडीने किमान चारशे ते साडेचारशे जणांना उपचारांसाठी दाखल करण्याची सोय झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला घाबरून न जाता नागरिकांनी कोरोना संबंधिचे नियम पाळावेत. मास्क घालावा, सतत हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. ज्या नागरिकांनी लस घेतली नाही किंवा लशीचा पहिला डोस घेतला; पण दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी लवकरात लवकर लशीचा डोस घ्यावा, असेही आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment