Saturday, April 26, 2025
Homeमहत्वाची बातमीनेम यूपीएवर, काँग्रेस घायाळ

नेम यूपीएवर, काँग्रेस घायाळ

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

त्रृणमूल काँग्रेसच्या बॉस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेसवर नेम धरल्यामुळे एकशे पस्तीस वर्षांच्या अखिल भारतीय पक्षाची गोची झाली आहे. ममता मुंबईत आल्या, शिवसेना नेत्याच्या कन्येच्या विवाहाला उपस्थित राहिल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी तासभर चर्चा केली. पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपवर तोंडसुख घेतलेच. भाजप हटावो, देश बचाव, असा कार्यक्रम जाहीर केला. पण पर्याय म्हणून यूपीए आहे का, असे विचारले असताना त्यांनी ‘कुठे आहे यूपीए?’ असा प्रश्न विचारून काँग्रेसवरच नेम धरला. निम्मा वेळ विदेशात राहून देशाचे राजकारण करता येत नाही, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. ममता हुशार आहेत, त्यांनी थेट काँग्रेस किंवा राहुल यांचे नाव घेतले नाही, पण मोदी सरकार हटविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कुचकामी आहे, असे मोकळेपणाने सांगून टाकले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या टेकूवर सरकार उभे आहे. राज्याच्या राजधानीत येऊन त्यांनी काँग्रेस पक्षाची अब्रूच देशाच्या वेशीवर टांगली.

ममता यांनी यूपीएवर नेम धरला, पण गोळी काँग्रेसला अचूक लागली. सन २००४मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावर सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ठरला. काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत नव्हते. भाजपला हटवून किमान समान कार्यक्रमावर सरकार स्थापन करण्यासाठी युनायटेड प्रोग्रेसिव्ह फ्रंटची स्थापना करण्यात आली.

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले व यूपीएचे चेअरमन म्हणून सोनिया गांधी यांची निवड झाली. यूपीए म्हणजे सरकार स्थापनेसाठी भाजप विरोधकांची बांधलेली एकत्र मोट होती. ही मोट काळानुसार फुटली. काँग्रेसला यूपीतील मित्रपक्षांना बरोबर ठेवता आले नाही आणि एवढेच काय तर मोदी पर्व सुरू झाल्यावर काँग्रेसला स्वत:चा पक्षही धड संभाळता आला नाही. ‘यूपीए कुठे आहे,’ या प्रश्नाने देशभरातील राजकारण ढवळून निघाले. याच ममता यांनी काँग्रेसला पश्चिम बंगालमधून संपवले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार तेथे विधानसभेवर निवडून आला नाही. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी किमान खासदारांची संख्याही काँग्रेसला निवडून आणता आलेली नाही. महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आहे, पण राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.

ममता यांनी काँग्रेसचे वस्त्रहरण केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मनातून निश्चितच सुखावले असतील. राजकीय सौदेबाजी करताना काँग्रेसची किंमत कमी झाली, तर त्यांना ते हवेच आहे. शरद पवार वारंवार सांगत असतात की, काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची आघाडी होऊ शकत नाही…, मग पवारांच्या भेटीनंतर ममता यांनी ‘यूपीए आहेच कुठे,’ असा प्रश्न का विचारावा…?

आज तृणमूल काँग्रेसची शक्ती पश्चिम बंगालपुरती मर्यादित आहे. तिथे तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. कोलकात्याच्या रायटर्स बिल्डिंगमध्ये जे वर्षानुवर्षे सरकार म्हणून बसले, तो मार्क्सवादी कम्युनिस्ट व काँग्रेस हे दोन्ही पक्ष या राज्यातून साफ झाले. ज्या पक्षाचे २०१५मध्ये केवळ दोन आमदार होते, त्या भाजपचे यंदा ८० आमदार निवडून आले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींविरोधात जी पोकळी निर्माण झाली होती, ती भाजपने भरून काढली. किंबहुना, ममता यांच्या मुस्लीम तुष्टीकरणाला बंगाली जनतेने हिंदुत्ववादी भाजप हा पर्याय शोधला आहे. तृणमूल काँग्रेस या राज्याबाहेर कुठेही प्रभाव दाखवू शकलेली नाही. नुकत्यात झालेल्या त्रिपुरा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. पन्नास-पंचावन्न आमदार आणि सात-आठ खासदार ही या पक्षाची शक्ती. शरद पवारांसारखे मुरब्बी, दिग्गज नेतृत्व असूनही या पक्षाचे वीस वर्षांत शंभर आमदार कधी निवडून आले नाहीत. शिवसेनेचीही तीच अवस्था. राज्याबाहेर अन्यत्र कुठे स्थान नाही. मुंबई-ठाण्याबाहेर पक्षाला फारसा रसही नाही. या पक्षाने राज्याला तीन मुख्यमंत्री दिले. भाजपबरोबर युती असताना दरवेळी डझन-दीड डझन खासदार निवडून आले, पण राज्यात शिवसेनेचे कधी शंभर आमदार निवडून आले नाहीत. पूर्वी काँग्रेसने व आता भाजपने जसे यश मिळवले तसा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला विश्वास संपादन करता आला नाही.

ममता यांना एनडीए व यूपीए दोन्ही घरचा चांगला अनुभव आहे. त्या मूळच्या काँग्रेसच्या. १९९९मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्या एनडीएमध्ये आल्या व रेल्व मंत्रीपद संभाळले. २००१मध्ये त्या एनडीएतून बाहेर पडल्या, पुन्हा २००३मध्ये एनडीएमध्ये परतल्या व केंद्रात खाणमंत्री झाल्या. भाजप हा आपला नैसर्गिक सहयोगी आहे, असे त्यांनी उद्गार काढले होते. २००४ची निवडणूक त्यांनी एनडीएबरोबर लढवली. २००८मध्ये त्यांनी एनडीएचा राजीनामा दिला व यूपीएमध्ये प्रवेश केला. २०१२मध्ये यूपीएतून त्या बाहेर पडल्या. तेव्हापासून त्या काँग्रेस आणि भाजप दोघांच्या विरोधात लढत आहेत.

उत्तर प्रदेशात सपा, बसप, ओरिसात बिजू जनता दल, तामिळनाडूत द्रमुक, अण्णा द्रमुक, आंध्र प्रदेशात तेलुगू देसम, वायएसआर काँग्रेस, तेलंगणात टीआरएस, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, कर्नाटकात जनता दल एस, केरळमध्ये सीपीआय, झारखंडमध्ये झारखंड मुक्तीमोर्चा, बिहारमध्ये राजद, पंजाबात अकाली दल आदी प्रादेशिक पक्ष हे त्या-त्या राज्यापुरते सीमित आहेत. ते काय ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार आहेत काय? प्रादेशिक पक्षांना एकत्र आणणे व मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी भाजपविरोधकांची मोट बांधणे, हे काही सोपे नाही. ममता यांच्या प्रयत्नांचे अखिलेश सिंग यांनी स्वागत केले आहे व अखिलेशच्या रथयात्रेत आपण सहभागी होणार असल्याचे ममता यांनी जाहीर केले आहे; कारण त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात लढणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला २०२४मध्ये केंद्रातून हटवणे शक्य नाही, हे ममता आणि कंपनीला कळून चुकले आहे, म्हणूनच काँग्रेसमुक्त प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची नवीन टूम त्यांनी काढली आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -