
नवी दिल्ली : सलामीवीर रोहित शर्मा आता भारताच्या एकदिवसीय (वनडे) संघाचेही कर्णधारपद भूषवेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी रोहितची बुधवारी नियुक्ती झाली. रोहितकडे टी-ट्वेन्टी संघाचीही धुरा आहे. वनडे संघाची घोषणा नंतर केली जाणार आहे.
विराट कोहलीने वनडे संघाचे नेतृत्व सोडले की निवडसमितीने रोहितची निवड केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहितला कसोटी संघातही बढती देताना उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणे यापूर्वी व्हाइस कॅप्टन होता. २०२३ मध्ये भारतात वनडे विश्वचषक होणार आहे. त्यादृष्टीने रोहित शर्माला कर्णधारपद मिळणे, हा मोठा बदल मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. रोहितने २२७ वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना ४८.९६च्या सरासरीने ९२०५ धावा केल्या आहेत. यामध्ये २९ शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी १८ सदस्यीय भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. कोरोना नियमावली लक्षात घेऊन जम्बो संघ पाठवण्यात येणार आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे हा दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता होती. मात्र क्रिकेट दक्षिणआफ्रिका आणि बीसीसीआय यांनी परिस्थितीचा आढावा घेत दौऱ्याचं स्वरुप बदललं आहे. सुधारित दौऱ्यात तीन कसोटी आणि तितकेच वनडे होणार आहेत. टी-ट्वेन्टी मालिका तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
समाधानकारक कामगिरी नसल्याने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना आफ्रिका दौऱ्यात संधी मिळणार का याविषयी साशंकता होती. या दोघांचीही आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध दमदार पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरलाही संघात स्थान मिळालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध संघात नसलेल्या मात्र दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरील भारताच्या ‘अ’ संघाचा भाग असलेला हनुमा विहारी संघात परतला आहे. दुखापतीमुळे सलामीवीर शुबमन गिलची संघात निवड करण्यात आलेली नाही. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचाही संघनिवडीसाठी विचार करण्यात आलेला नाही.
भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत(यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज. राखीव : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर आणि अर्झान नागासवाला.