
मिरपूर : दुसरी कसोटी एक डाव आणि ८ धावांनी जिंकताना पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांच्या मालिकेत २-० अशा फरकाने बाजी मारली.
फॉलोऑनच्या नामुष्कीमुळे २१३ धावांनी पिछाडीवर पडलेल्या यजमानांसमोर डावाचा पराभव टाळण्याचे आव्हान होते. ८४.४ षटके खेळूनही त्यांना पराभव पाहावा लागला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आघाडी फळी मोडून काढली. त्यामुळे ४ बाद २५ धावा अशी बांगलादेशची नाजूक अवस्था होती. मधल्या फळीत अष्टपैलू शाकीब अल हसनसह (६३ धावा) मुशफिकुर रहिम (४८ धावा) आणि लिटन दासने (४५ धावा) पाकिस्तानचा मारा बऱ्यापैकी खेळून काढला. मात्र, त्यांच्या विकेट पडल्यानंतर दहा षटकांत यजमानांच्या डावाची २०५ धावांमध्ये इतिश्री झाली.
पाकिस्तानकडून ऑफस्पिनर साजिद खानने दुसऱ्या सर्वाधिक ४ विकेट टिपल्या. शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अलीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पाचव्या आणि अंतिम दिवशी बांगलादेशचा पहिला डाव ३२ षटकांत ८७ धावांत आटोपला. यजमानांना उर्वरित डाव ६ षटकांत संपला. पाकिस्तानने पहिला डाव ४ बाद ३०० धावांवर घोषित करताना दमदार सुरुवात केली होती. फलंदाजांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीवर गोलंदाजांनी कळस चढवला.