नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा जगातल्या सर्वात प्रभावी १०० महिलांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. यावर्षी सलग तिसऱ्यांदा निर्मला सीतारमण यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील १०० सर्वात प्रभावी महिलांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश होत आहे.
त्यांनी अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन यांना देखील मागे टाकले असून थेट ३७ व्या स्थानी झेप घेतली आहे. जगभरातील १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये एकूम चार भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये निर्मला सीतारमण यांचा क्रमांक सर्वात वरचा असून त्याखालोखाल ५२, ७२ आणि ८८ अशा क्रमांकावर भारतीय महिला आहेत.
२०१९ आणि २०२० या दोन वर्षी फोर्ब्सने जाहीर केलेल्या १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारमण यांचा समावेश झाला होता. यंदा पुन्हा एकदा त्यांची या यादीमध्ये वर्णी लागली असून त्या ३७व्या क्रमांकावर आहे. त्याउलट अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन या ३९व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी निर्मला सीतारमण या यादीमध्ये ४१व्या स्थानी होत्या.