मुंबई (प्रतिनिधी) : १७ व्या शतकात भारतात, युद्धासाठी सज्ज अशा नौदलाची उभारणी करणारे, नौदलाचे संस्थापक, द्रष्टे राजे म्हणून अनेक इतिहासकार ज्यांना मानतात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाची वचनबद्धता ही मानवंदनाच आहे. असे वक्तव्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी मुंबईत एका समारंभात भारतीय नौदलाच्या २२ व्या क्षेपणास्त्र युद्धनौका तुकडीला राष्ट्रपती स्टँडर्ड हा सन्मान प्रदान केला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रासाठी केलेल्या सेवाकार्यासाठी सर्वोच्च अधिकाऱ्यांनी लष्करी तुकडीला दिलेला सर्वोच्च सन्मान म्हणजे प्रेसिडेंट्स स्टँडर्ड पुरस्कार आहे. आत्मनिर्भर भारत व्हिजनचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणाप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, “नौदलाची वचनबद्धता ही छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली आहे, ज्यांना अनेक इतिहासकार भारताच्या युद्धासाठी सज्ज नौदलाचे संस्थापक मानतात.
कोविंद म्हणाले, “राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान प्रदान करणे म्हणजे या तुकडीच्या विद्यमान आणि माजी अधिकारी तसेच नाविकांनी राष्ट्राप्रती केलेल्या अतुलनीय सेवा आणि समर्पणाला दिलेली पावतीच आहे. पन्नास वर्षांपूर्वी १९७१ च्या युद्धात पाकिस्तान नौदलाची जहाजे बुडवण्यात २२ व्या क्षेपणास्त्र तुकडीने बजावलेल्या भूमिकेची त्यांनी आठवण करून दिली. खरे तर, प्रामुख्याने देशाच्या किनाऱ्याच्या संरक्षणासाठी आणलेल्या या युद्धनौका आपल्या नौदलासाठी युद्धातील सर्वात शक्तिशाली लढावू ताकद ठरली. ही लढाई आपल्या नौदलाच्या जवानांच्या कुशाग्रतेचे आणि शौर्याचे प्रतीक ठरली आहे, असे यावेळी कोविंद म्हणाले.
१७ वे शतक आत्मनिर्भर भारताचा भाग म्हणून स्वदेशीकरणाबाबत भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेबद्दल आनंद व्यक्त करत राष्ट्रपती म्हणाले, हिंद-प्रशांत क्षेत्रात येणाऱ्या भू-राजकीय आव्हानांचा सामना करण्यात, महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी भारताला मिळाली आहे. बहुतांश जागतिक सागरी व्यापार हिंद महासागर क्षेत्रातून होतो. त्यामुळे या प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था राखणे केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान समारंभादरम्यान परिपूर्ण पथसंचलन झाले. ज्याची सुरुवात नौदलाच्या सशस्त्र दलाने राष्ट्रपतींना सलामी देऊन केली. त्यानंतर राष्ट्रपती स्टँडर्ड सन्मान प्रदान करण्यात आले. नौदलाच्या जवानांच्या कवायती आणि मार्कोस आणि नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकाने समारंभाचा समारोप झाला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.