मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून मंगळवारी चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी तनपुरे यांची ईडीकडून ही चौकशी करण्यात आली. प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे.
ईडीकडून या अगोदर अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांची चौकशी सुरू असताना आता प्राजक्त तनपुरे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सक्तवसुली संचलनालयाकडून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची चौकशी केली जात असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असताना यामध्ये मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. दरम्यान ईडीने समन्स बजावत प्राजक्त तनपुरे यांना हजर राहण्यास सांगितले होते. दुपारी ३ वाजता सुरू झालेली प्राजक्त तनपुरे यांची चौकशी १० वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल सात तासांनी प्राजक्त तनपुरे ईडीच्या कार्यालयाबाहेर आले.