स्वत:ची ओळख निर्माण होणे महत्त्वाचे!

Share

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

प्रत्येक महिला स्वतःच्या संसारासाठी, नवऱ्यासाठी, मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी आणि वडीलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी सातत्याने खपत असते. महिला गृहिणी असो, नोकरदार असो वा व्यावसायिक असो, तिला कुटुंबाप्रती सर्व कर्तव्य पार पाडावेच लागतात. सुशिक्षित असो वा अशिक्षित, गरीब घरातील असो वा श्रीमंत. महिलांना त्यांची दैनंदिन कर्तव्ये, घरकामे, घरातील रुग्णांची सुश्रूषा चुकत नाही. इतकेच काय, पण एखादी महिला फारकत घेऊन माहेरी राहत असेल, अथवा एकटी राहत असेल, वैधव्य आलेली असेल तरी, तिला उदरनिर्वाहासाठी झटणे क्रमप्राप्त असते. मुलंबाळ असल्यावर तर ही जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक पार पाडणे जास्त जिकिरीचे असते. एकटी महिला जेव्हा मुलांचे संगोपन पतीपासून लांब राहून अथवा पतीच्या निधनानंतर करते तेव्हा तिला खूप अडचणींना, मुलांच्या प्रश्नांना, समाजातील टीकेला, सासर-माहेरील लोकांच्या टोमण्यांना सामोर जावे लागते. पण या सगळ्यात ती स्वतः कुठे असते? ती तिच्या अपेक्षेनुसार जगत असते का?

समुपदेशन करताना, अनेक महिलांशी बोलताना हेच लक्षात येते की, अनेक महिला वर्षानुवर्षे संसारात गुरफटून गेलेल्या आहेत. घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, त्यांचे टाइमटेबल सांभाळताना त्यांनी स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. स्वतःची तब्बेत, खाणे-पिणे, हिंडणे-फिरणे, मैत्रिणींना भेटणे, स्वतःचे छंद, कला जोपासणे, पुरेसा आराम करणे, पथ्यपाणी जपणे याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. इतरांची मर्जी सांभाळताना त्या स्वतःला विसरून गेलेल्या आहेत. आपल्याही काही आवडी-निवडी आहेत, आपलेही विचारांचे अस्तित्व आहे, आपल्याला देखील नवीन काही पाहायची, शिकायची आवड आहे, लोकांमध्ये मिसळायचे आहे, खूप फिरायचे आहे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे, यावर त्यांनी विचार करणेसुद्धा सोडून दिलेले आहे. या सर्व गोष्टींशी तडजोड करून, संपूर्ण आयुष्य त्याग करून देखील त्या सुखी नाहीत, समाधानी नाहीत. त्या तर नाहीच, पण कुटुंबात पण त्यांना काही खूप मोठे आदराचे मानसन्मानाचे, कौतुकाचे स्थान नाही. महिलांवर कळत-नकळत अनेक बंधनं, अनेक जबाबदाऱ्या इच्छा नसताना देखील येऊन पडलेल्या असतात. मनाविरुद्ध त्याचा स्वीकार त्यांनी केलेला असतो. कोणाला दुखवायचं नाही, याच मानसिकतेमधून त्या कोणत्याही कामाला, जबाबदारीला नाही म्हणत नाहीत. त्यांच्याही नकळत त्यांचा सर्व वेळ, श्रम, ताकद, कौशल्य अशाच गोष्टींमध्ये जात राहाते, ज्या करण्यात त्यांना थोडाही रस अथवा आवड नसते; परंतु घरच्यांनी तिला पूर्णपणे गृहीत धरलेले असते आणि त्याच वेळी ते काम झालेले नसल्यास तिला असे काही ऐकवले जाते की, ती जणू काही मशीन आहे आणि जसा तिचा जन्मच सगळ्यांच्या या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झालेला आहे.

आपल्या आयुष्यात सातत्याने अशा प्रकारची तडजोड करावी लागू नये, यासाठी महिलांनी त्यांच्या युवा अवस्थेपासूनच काही बाबी निश्चित करणे आवश्यक आहे. लग्नाआधीच स्वतः जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा, विविध व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याचा, विविध कलागुण छंद जोपासण्याच्या सातत्याने प्रयत्न करीत राहा. लग्नाच्या आधीच स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचा प्रयत्न करा. लग्नानंतरदेखील पुढील शिक्षणाची, नोकरीची संधी मिळाल्यास ती सोडू नका. सर्व एकत्र सांभाळताना थोडी तारांबळ नक्कीच होईल, पण स्वतःचे अस्तित्व, ओळख निर्माण होण्यासाठी हे खूप महत्त्वाचे असेल.

अनेकदा सासर खूप चांगलं मिळालं म्हणून, घरच्यांनी लवकर लग्न ठरवलं म्हणून अथवा प्रेमविवाह केला म्हणून महिलांचं शिक्षण अर्धवट राहते. एकदा संसारात गुंतल्यावर मग त्याबद्दल काही वाटेनासे होते. सर्व गरजा भागत आहेत, सधन कुटुंब मिळाले आहे, मग कशाला शिक्षण पूर्ण करत बसायचं? नोकरी किंवा व्यवसाय का करावा? कशाचीही कमतरता नाहीय, या विचारसरणीमधून महिला स्वतःला घर एके घर या पिंजऱ्यात बंद करून घेते. मुलं जोपर्यंत लहान आहेत, तोपर्यंत त्यांच्या प्रती सर्व कर्तव्य पार पडताना तिचे दिवस निघून जातात. पण एकदा मुलं मोठी झाली, संसारातील नवलाई संपली की, आपण कोण आहोत? आपली ओळख काय? बाहेरील जगात काय सुरू आहे? आपल्या बरोबरीच्या मैत्रिणी कुठे आहेत, काय करीत आहेत? आपल्याला समाजात कोण कोण ओळखतं? काय म्हणून ओळखतं? हे प्रश्न मनाला सतावू लागतात. आपल्यात पहिल्यासारखा आत्मविश्वास, धडाडी, निर्णय क्षमता, साहस, उमेद शिल्लक राहिली आहे का? यावर महिला विचार करू लागते आणि या प्रश्नांची जेव्हा नकारात्मक उत्तरे तिला मिळतात, तेव्हा तिचे मनोबल अजून कमी होते.
meenonline@gmail.com

Recent Posts

Nitesh Rane : हिंदू म्हणून एकत्र या, हे सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे

मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…

9 minutes ago

लवकरच येत आहे प्लानेट स्त्री, महिलांसाठी स्वतंत्र ओटीटी

मुंबई : 'प्लानेट मराठी'चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी 'प्लानेट स्त्री'…

33 minutes ago

Akshaya Tritiya : १०० वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला तयार होणार दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींचे सुरू होतील चांगले दिवस

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात शुभ काळांपैकी एक मानला जातो.…

54 minutes ago

Seema Haider: “मला पाकिस्तानला जायचे नाही. मला इथेच राहू द्या”, सीमा हैदरचे मोदींना साकडं

उत्तर प्रदेश: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

1 hour ago

सिंधू नदीचे एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ देणार नाही

जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांचा इशारा नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २७ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग प्रीती. चंद्र राशी मेष.…

2 hours ago