Friday, July 11, 2025

कोरोना रुग्णसंख्या वाढत असूनही वसईत शाळा सुरूच

कोरोना रुग्णसंख्या वाढत असूनही वसईत शाळा सुरूच

नालासोपारा  :वसईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना अजूनही शाळांना सुट्टी देण्यात आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी शाळा सुरू ठेवण्यात आली असून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. पालिकेने शाळा बंद करण्याचे आदेश अजूनही काढले नसल्याने लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भाव पसरला, तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित राहात आहे.



राज्यात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई, नाशिक आणि पुणे या पालिकांनी शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहे. सदर मनपा प्रशासन लहान मुलांच्या जीवाच्या विचार करत असून ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव बघता शाळा न सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, दुसरीकडे वसई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही शाळा अजूनही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



वसई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून वसईत निर्बंध देखील कडक करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मास्क वापरण्यावरही आता सक्ती करण्यात आलेली आहे. अशी परिस्थिती असताना वसईमध्ये अद्यापही शाळा का सुरू?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु त्यातल्या काही शाळा ६ डिसेंबर म्हणजेच सोमवारी पुन्हा बंद करण्यात आल्या; परंतु अजूनही विरार पूर्व, नालासोपारा पूर्व तसेच वसई येथे मुख्य ठिकाणी असलेल्या शाळा या अद्यापही सुरू आहेत.



विरार पूर्व हे गर्दीचे ठिकाण आहे. तसेच नालासोपारा पूर्वेला सुद्धा फेरीवाल्यांमुळे अतिशय गर्दी होत असते. त्यांच्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती असताना शाळा अजूनही सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत; परंतु शाळा मालकांची यात काही चूक नसल्याचे दिसून येत आहे. कारण पालिकेने अद्यापही कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी महानगरपालिकेने शाळांबाबत अद्यापही कोणताही आदेश काढला नाही. त्यामुळेच शाळा बिनधास्तपणे सुरू ठेवण्यात आल्या आहे. काही शाळा या बंद झाल्या असून आता विद्यार्थी घरून पुन्हा ऑनलाइन शिक्षण घेत आहेत; परंतु ज्या शाळा गर्दीच्या ठिकाणी आहेत ते अजूनही सुरू असल्याने लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.




संसर्ग वाढत असताना शाळा सुरू ठेवणे कितपत योग्य?



कोरोनाचा तसेच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका हा दिवसेंदिवस वाढत चालला असतानाच वसईतील पूर्व भागात जिथे घनदाट गर्दी असते, अशा ठिकाणी शाळा सुरू ठेवणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष करून लहान मुलांच्या जीवाशी खेळ का सुरू ठेवला आहे?, असाही प्रश्न उपस्थित राहत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >