Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

एसटीच्या ८० हजार कर्मचाऱ्यांना वेतनकपातीचा फटका

एसटीच्या ८० हजार कर्मचाऱ्यांना वेतनकपातीचा फटका

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या महिन्याभरापासून एसटी संपात सहभागी असणाऱ्या तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा फटका बसला आहे. परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन महिन्याच्या ७ तारखेला जमा केले आहे. त्यानुसार, संपात सामील नसलेल्या सुमारे १० हजारांहून अधिक कामगारांना वेतनवाढीसह १०० टक्के सुधारित वेतन मिळाले असून ८० हजार कामगारांना वेतन कपातीचा सामना करावा लागला आहे.


गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. मात्र, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून मोठी वेतनवाढीचा आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एसटीचे जे कर्मचारी संपकाळात नियमित कामांवर हजर राहिले आहेत, त्याच कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून नवीन वेतनश्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येत आहे. एसटी महामंडळाने १०० टक्के कामगारांचे वेतन ७ तारखेला केल्याचा दावा केला आहे. तथापि, सरासरी ८० हजारांहून अधिक कामगारांना पहिल्या आठवड्यातील हजेरीसाठी सुधारित वेतनवाढीचा लाभ मिळाला आहे. याउलट मोठ्या संख्येने संपापासून दूर असलेले यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीसह १०० टक्के पगार जमा झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील सुमारे २० हजार कामगार हे ऑक्टोबर महिन्यापासूनच संपावर असल्याने त्यांना वेतनवाढ मंजूर झाली असली, तरी नोव्हेंबर महिन्यातील शून्य उपस्थितीमुळे त्यांच्या खात्यावर पगार जमा झालेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वच एसटी कामगारांना मिळणारी पगारातील तफावत मात्र त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे.

Comments
Add Comment