Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाइंग्लंडचा १४७ धावांत खुर्दा

इंग्लंडचा १४७ धावांत खुर्दा

अॅशेस मालिका : कर्णधार कमिन्सच्या पाच विकेट; अंधुक प्रकाशामुळे ४० षटकांचा खेळ वाया

ब्रिस्बेन (वृत्तसंस्था) : अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरुवात करताना इंग्लंडला पहिल्या डावात १४७ धावांमध्ये रोखले. यजमानांच्या उंचावलेल्या कामगिरीत कर्णधार पॅट कमिन्सच्या अचूक आणि प्रभावी मारा निर्णायक ठरला. त्याने ३८ धावा देत निम्मा संघ गारद केला. पावसानंतरच्या अंधुक प्रकाशामुळे चहापानानंतर खेळ थांबवावा लागला. त्यामुळे तिसरे सत्र वाया गेले.

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पाहुण्या कर्णधाराचा निर्णय त्यांच्यावरच उलटला. इंग्लंडच्या केवळ ४ फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या तर तिघे खातेही उघडू शकले नाहीत. त्यात इंग्लिश कॅप्टनचाही समावेश आहे.

कमिन्सने इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्याने सलामीवीर हसीब हमीदसह (२५ धावा) मधल्या फळीत बेन स्टोक्स (५ धावा) तसेच तळातील ख्रिस वोक्स (२१ धावा), ऑली रॉबिन्सन (०) आणि मार्क वुडला (८ धावा) बाद केले. मात्र, स्टार्क आणि हॅझ्लेवुडनेही नियंत्रित गोलंदाजी केली. स्टार्कने डावातील पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रॉरी बर्न्सचा त्रिफळा उडवला. अॅशेस मालिकेमध्ये पहिल्या चेंडूवर बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला. तो खातेही उघडू शकला नाही. दुसऱ्या बाजूने हॅझ्लेवुडने वनडाऊन डॅविड मालनला यष्टिरक्षक अलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. पुढच्याच षटकात कर्णधार रूटला डेव्हिड वॉर्नरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे सहाव्या षटकात पाहुण्यांची व्यवस्था ३ बाद ११ धावा अशी झाली. हमीदने थोडा प्रतिकार केला तरी त्याच्यासह बेन स्टोक्सला बाद करताना कमिन्सने इंग्लंडला (५ बाद ६० धावा) आणखी अडचणीत आणले.

निम्मा संघ ६० धावांमध्ये बाद झाल्यानंतर इंग्लंडची ‘शंभरी’ भरली, असे वाटत असताना पोप आणि बटलरने यजमानांच्या माऱ्याचा समर्थपणे सामना करताना सहाव्या विकेटसाठी ५२ धावा जोडताना संघाचे ‘शतक’ फलकावर लावले. उपाहारानंतर बटलरला बाद करताना स्टार्कने जोडी फोडली. इंग्लंडच्या यष्टिरक्षक-फलंदाजाने ५८ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यांच्या डावातील या सर्वाधिक आहेत. या खेळीत बटलरने ५ चौकार मारले. त्यानंतर पोपला बाद करताना कॅमेरॉन ग्रीनने अॅशेसमधील पहिली विकेट मिळवली. पोप-बटलर जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचे शेपूट लवकर गुंडाळले. त्यात ख्रिस वोक्सने २१ धावा करताना संघाला दीडशेच्या घरात नेले. कमिन्सने ‘कॅप्टन्स बॉलिंग’ पेश करताना १३.१ षटकांत ३ षटके निर्धाव टाकताना ३८ चेंडूंत पाच विकेट टिपल्या. त्याला मिचेल स्टार्क (३५-२) आणि जोश हॅझ्लेवुडचे (४२-२) चांगले सहकार्य लाभले. ग्रीनने (६-१) विकेट मिळवली. मात्र, ऑफस्पिनर नॅथन लियॉनला (२१-०) एकही विकेट मिळाली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -