रत्नागिरी : दुचाकी वाहन चालवताना चालकांकडे हेल्मेट नसल्यास लायसन्सच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेत केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्राच्या सुधारित मोटर वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हात विना लायसन्स वाहन चालवणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हेल्मेट न घातल्यास दुचाकी वाहन चालवणाऱ्यांचे लायसन्स देखील रद्द होणार आहे. राज्यात, जिल्ह्यात अपघातांमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. याची दखल घेत राज्याने सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार आता हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंडासह तीन महिन्यांसाठी लायसन्स देखील रद्द केले जाणार आहे. या व्यतिरिक्त विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचे देखील लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. वाहन क्रमांकाशी छेडछाड करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.