ठाणे (वार्ताहर) : ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी दिले आहेत. केंद्र सरकारच्या ५० टक्के निधीतून राबविण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील कामांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याची व बहुसंख्य कामे मंदगतीने सुरू असल्याबाबत ठाणे शहर भाजपने केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर विशेष बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय नगर विकास खात्यातर्फे बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख अरुणकुमार यांच्याबरोबरच नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, शहर उपाध्यक्ष सुजय पत्की यांचीही उपस्थिती होती.
न्यायालयीन वादात अडकण्याची शक्यता असलेला व पालिकेच्या ताब्यात जागा नसतानाही ठाणे व मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र, त्याचे काम सुरूच झालेले नाही. ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्पासाठी २६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यातील केवळ ३८ टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंब्रा-रेतीबंदर, नागला बंदर, कावेसर, वाघबीळ आणि कोपरी येथील वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, अद्याप ती अपूर्ण आहेत. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील पाणीपुरवठ्याचे रिमॉड्युलिंग, गावदेवी पार्किंग आदी कामे पाच वर्षांनंतरही पूर्ण झालेली नाहीत, याकडे भाजप नेत्यांनी बैठकीत लक्ष वेधले.
पाणीपुरवठ्याच्या स्मार्ट मिटरिंगच्या कामासाठी १२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले, पण त्या कामांचा अपेक्षित परिणाम झालेला नाही. मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणासाठी ११ कोटी २२ लाख रुपये खर्च झाले. मात्र, ते काम निकृष्ट दर्जाचे झाले. तलावाभोवती लावलेल्या काचा निखळण्याचे प्रकार घडले आहेत. केवळ एक मोबाईल अॅप तयार करण्यासाठी पालिकेने ठाणे प्रकल्पातून २८ कोटी ८० लाख रुपयांचे काम दिले होते. मात्र, त्यातून अपेक्षित परिणाम झालेला नाही.
कमांड सेंटरमधून सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार होते. मात्र, तो उद्देशही साध्य झालेला नाही, असे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले. विशेष म्हणजे पूर्ण झालेल्या २० कामांमध्ये १२ स्मार्ट शौचालयांचा समावेश आहे. तयार केलेली काही शौचालयेही महापालिकेने बंद करून ठेवली आहेत. स्मार्ट सिटी प्रकरणातील सल्लागार कंपन्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आल्याचे ते म्हणाले.
स्मार्ट सिटी योजनेतून ठाणे महापालिकेने मंजूर केलेल्या ३५ प्रकल्पांपैकी केवळ २० प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण झाले आहेत. या २० पैकी १२ प्रकल्प हे शौचालयांचे आहेत. ठाणे पालिकेला केंद्र सरकारने १९६ कोटी व महाराष्ट्र सरकारने ९८ कोटी रु. दिले, तर महापालिकेने २०० कोटी दिले होते. पालिकेच्या २०० कोटी रुपयांपैकी ९३ कोटी रुपये खर्च झाले. अशा प्रकारे तब्बल ३८७ कोटी रुपये खर्च होऊनही स्मार्ट सिटी प्रकल्पातून नागरिकांना काहीही फायदा झालेला नाही. शहरात नागरी सुविधांचा ठणठणाट आहे, याकडे भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठकीत लक्ष वेधले.
डॉ. वैशाली वाढे भारतीय संस्कृतीत प्रत्येक वस्तू, पोशाख किंवा शृंगाराचा अर्थ खोल आहे. स्त्रीसाठी ‘कुंकू’…
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड बीड…
वृंदा कांबळी एक मोठा लेखक म्हणून तसेच एक मोठा माणूस म्हणून ते जगावेगळेच होते. दळवी…
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची रामायणे घडावी…
श्रद्धा बेलसरे खारकर राहुल सवने यांचा व्यवसाय होता रद्दी विक्री करण्याचा. रोज सकाळी उठून सायकलला…
भावार्थ देखणे आज हिंदू धर्मालाही अक्षय्य होण्याची गरज आहे. तो व्यापक आहे. मात्र काही रुढींमुळे…