Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीओमायक्रॉनमुळे फेब्रुवारीत येणार तिसरी लाट!

ओमायक्रॉनमुळे फेब्रुवारीत येणार तिसरी लाट!

आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला अंदाज

मुंबई / नवी दिल्ली : ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीमध्ये येऊ शकते, असा अंदाज आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र दुसऱ्या लाटेपेक्षा ही लाट कमकुवत राहण्याची देखील अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या शास्त्रज्ञांच्या मते, तिसऱ्या लाटेत दररोज जास्तीत जास्त १ ते दीड लाखांपर्यंत प्रकरणे येऊ शकतात. कोरोना रिसर्ज टीममध्ये सहभागी असलेले डेटा सायंटिस्ट मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, या मोठ्या आकड्यामागे ओमायक्रॉनचा सर्वात मोठा प्रभाव असू शकतो.

असे जरी असले तरी फार घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र या व्हेरियंटला हलक्यातही घेता येणार नाही, असे अग्रवाल म्हणाले. आतापर्यंतच्या पाहणीत असे दिसून आले आहे की, ओमायक्रॉन हा दुस-या लाटेतील डेल्टासारखा घातक नाही. परंतु रुग्णसंख्येत मात्र झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी दक्षिण आफ्रिकेत आढळून येत असलेल्या रुग्णांकडे पाहण्याची गरज आहे. जिथे रुग्णांची संख्या जास्त असूनही रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. येत्या काही दिवसांत नवीन संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे प्रमाण पाहता परिस्थिती अधिक स्पष्ट होईल, असेही आयआयटी टीमकडून सांगण्यात आले आहे.

देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी २ डिसेंबरला देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांतच हा आकडा २३ वर पोहचला. इकडे राज्यात आतापर्यंत १० जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन अधिक संक्रामक आहे. त्याचा फैलाव अतिशय वेगाने होतो. सध्याची परिस्थिती पहाता कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत टोक गाठेल. त्यावेळी देशात एक ते दीड लाख रुग्ण आढळून येतील, असा अंदाज आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत येईल. मात्र तिची तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल, असे आयआयटीचे शास्त्रज्ञ मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

देशात लॉकडाऊन लागणार का?

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला. तिथे आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अद्याप तरी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले नाही. नवा व्हेरिएंट जास्त संक्रामक आहे. मात्र त्याचा परिणाम गंभीर नाही. तो डेल्टाच्या तुलनेत अतिशय कमी आहे, असे अग्रवाल म्हणाले. रात्री संचारबंदी लागू केल्यास, गर्दीवर निर्बंध आणल्यास कोरोनाचा फैलाव कमी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

सध्या देशात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?

आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. पैकी १० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राजस्थानमध्ये ९ रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकमध्ये २, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. २ डिसेंबरला देशात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. बंगळुरूमध्ये हा रुग्ण आढळून आला. रविवारी पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण सापडले. यापैकी ६ जण एकाच कुटुंबातील आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -