Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रकल्याणच्या लहानग्यांनी सर केला अवघड असा मलंगगड

कल्याणच्या लहानग्यांनी सर केला अवघड असा मलंगगड

कल्याण (वार्ताहर) : कल्याणच्या ३ लहान मुलांनी कठीण समजला जाणारा मलंगगड दोरखंडाच्या सहाय्याने पार केला आहे. कुठेही घाबरून न जाता ३ मुले गडावर गेली. ओम ढाकणे (४), परिणीती लिंगे(७) आणि अवंती गायकवाड(७) अशी या तीन मुलांची नावे आहेत. त्यांनी कठीण समजला जाणारा मलंगगड दोरखंडाने पार केला आहे. ‘सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर’ या गिर्यारोहण संघाच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गड पार केला.

मलंगगड सर करताना साहसाची आणि मनाची शक्ती असणे गरजेचे आहे. दोन कातळकडे केवळ एक लोखंडी पाइपला बांधून असल्याने त्यावर चालून मलंगगड सर करता येतो, असे भूषण पवार यांनी सांगितले. सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरच्या पवन घुगे, अक्षय जमदरे, दर्शन देशमुख, रणजित भोसले यांनी मुलांना गड चढण्यासाठी सहकार्य केले.

मलंगगड म्हणजे माथेरानच्या डोंगर रांगेमध्ये वसलेला गड. समुद्रसपाटीपासून मलंगगडाची उंची तीन हजार दोनशे फूट इतकी आहे. विशेष म्हणजे किल्ल्याच्या वर गेले की जीर्ण झालेला वाडा दिसतो. तसेच पाण्याच्या टाक्यासुद्धा तेथे अद्याप अस्तित्वात आहेत.

इतिहास काळात किल्ल्याचा वापर हा कल्याण, भिवंडी, बदलापूर अशा जवळच्या शहरांवर लक्ष देण्यासाठी बनवला गेला असावा, अशी रचना आहे. कल्याणच्या दक्षिणेपासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर हा गड आहे. पनवेल-वावंजे गावापासून हा किल्ला दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा, उरणच्या नैऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -