नाशिक येथील ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले. आडगाव येथील एमईटी संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज नगरीतील संमेलनावर कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार होती. तरीही संमेलन सुखरूप पार पडले. नाशकात सारस्वतांचा मेळा तसेच साहित्याचा जागर पाहायला मिळाला. तरीही अनेकाविध घटनांमुळे यंदाचे संमेलन चर्चेचा विषय ठरले. संमेलनाच्या निमित्ताने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वागताध्यक्ष बनून स्वत:ला कायम प्रकाशझोतात ठेवले.
साहित्य संमेलन आणि राजकारण तसेच त्याचे राजकारण होणे, हे नेहमीच ठरलेले असते. यंदाही संमेलनांतर्गत तसेच प्रत्यक्ष राजकारण्यांवरून भरपूर राजकारण झाले. त्यातच कोरोनाचे संकट, संमेलनाच्या तोंडावर पडलेला पाऊस, प्रकृतीच्या कारणामुळे मावळते आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती, निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या नेत्यांची संमेलनाकडे फिरवलेली पाठ. त्यातच चिंतेची बाब म्हणजे समारोपाच्या दिवशीच सकाळ-सकाळी कोरोनाचे दोन रुग्ण सापडले. शिवाय दुपारी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून झालेली शाईफेक, अशा अनेक घटनांसह संमेलनाची सांगता झाली. अनेक अनपेक्षित घटना घडल्या तरी राज्यासह देशभरातील साहित्यिकांसह साहित्य रसिकांनी संमेलनाला हजेरी लावली. कोरोनाच्या सावटामुळे यंदाच्या संमेलनाबाबत साशंकता होती; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संमेलनाची तारीख निश्चित करण्यात आली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली; परंतु प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑनलाइन संवाद साधला. संमेलन पत्रिकेत नाव नसल्याने नाराज भाजप नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संमेलनापासून दूर राहणे पसंत केले. नियोजित अध्यक्ष जयंत नारळीकर उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु त्यांचे अध्यक्षीय भाषण प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी विज्ञान आणि साहित्य यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. समाजात अजूनही विज्ञानाने पाय रोवलेले नाहीत, याची पदोपदी जाणीव होते. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांना देखील कळत नाही, हे पाहून मन खिन्न होते, असे त्यांचे म्हणणे आहे. विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात, असा प्रश्न उपस्थित करतानाच मराठी साहित्यात विज्ञान साहित्य अल्प प्रमाणात असल्याबद्दल खंत डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली.
उद्घाटनाला अध्यक्षांच्या भाषणाची प्रत त्यांच्या आसनस्थानी ठेवल्यावरून समाजमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी याबाबत उद्विग्नता व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान व्हावा, यासाठी महामंडळाची घटनादुरुस्ती केल्यानंतर सलग तिसऱ्या संमेलनात अध्यक्षांच्या उपस्थितीबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी मांडल्या. मागील संमेलनाच्या वेळी तत्कालीन अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाच्या काही दिवस आधीच आजारी पडले. त्यांना विमानाने आणण्याची आयोजकांची क्षमता नसली तरी रेल्वेचे पहिल्या वर्गाचे तिकीट त्यांना काढून देण्यात आले होते. रेल्वेच्या डब्यातून त्यांना उतरता येत नव्हते तरी व्हीलचेअरवर ते संमेलनाच्या उद्घाटनासाठी आले, नाशिकचे आयोजक सर्व प्रकारच्या प्रवासाची व्यवस्था करीत असतानाही डॉ. नारळीकर आले नाहीत, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. यापुढे किमान हिंडता-फिरता अध्यक्ष निवडला पाहिजे, जेणेकरून पुन्हा घटना बदलण्याची वेळ न येवो, असे ठाले-पाटील यावेळी म्हणाले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी देशातील साहित्यिकांना वास्तव लिहिण्याचे आवाहन केले, मात्र इतकी वर्षे महाराष्ट्रात राहूनही सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या संमेलनात मराठीमध्ये संवाद साधू शकत नाहीत, याचे शल्य कायम आहे.
नाशिकमधील साहित्य नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव न दिल्याचा मुद्दाही गाजला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करीत साहित्य संमेलनाला उपस्थित राहणं टाळले. यावर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. त्यांचं साहित्य अजरामर आहे. सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांच्या नावाला विरोध कोणी करूच शकत नाही आणि यावर चर्चा होणंही योग्य नाही’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मांडली आहे.
‘राजा चुकतो आहे’ हे सांगण्याचा अधिकार लेखकांचा. त्यांचे ते स्वातंत्र्य राखले पाहिजे या भूमिकेचा मी आहे. मात्र, राजकीय व्यक्तींचे साहित्य संमेलनात काय काम? ही चर्चा योग्य नाही. साहित्यिकांना ‘वात्रटिका’ लिहिण्यासाठी सर्वाधिक मसाला राजकारणीच पुरवतात, असे सांगताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी राजाश्रय अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. आजवरच्या आयोजकांनी कधीही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला नाही. घरचे कार्य समजून त्यांनी केलेल्या आयोजनाचे कौतुक आहे. मात्र, पालकमंत्री छगन भुजबळ यांची ‘चमकोगिरी’ फारशी पटली नाही.