मुंबई : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणा सज्ज झाली असून त्यांच्याकडून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना ओमाक्रॉनची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.
हायरिस्क देशातून आलेली सर्व विमाने टर्मिनलच्या पूर्वेला उतरवण्यात येतील. प्रवाशाने विमानतळावर प्रवेश करताच थर्मल स्कॅनरमधून तापमान मोजले जाईल. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी १०० रजिस्ट्रेशन काऊंटर तयार करण्यात आले आहेत. प्रवाशांना कोरोना चाचणीसाठी ताटकळत राहावे लागू नये म्हणून ६८ सॅम्पल कलेक्शन बुथ तयार करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर आणि रॅपीड पीसीआर हे दोन पर्याय प्रवाशांकडे असतील. सॅम्पल कलेक्शननंतर प्रवाशी इमिग्रेशन प्रक्रिया पार पाडू शकतो. दरम्यान, प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्याला १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. तर रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास ७ दिवस होम क्वारंटाईन केले जाईल. ७ दिवसांनंतर या प्रवाशाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.