मुंबई/जालना/जळगाव : जालनामध्ये एसटी बसवर झालेल्या दगडफेकीचे पडसाद राज्यभरात उमटत असून एसटी संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे २५० पैकी १२३ डेपोंमधून वाहतूक सुरू झाली असली तरी निलंबनाची कारवाई सुरूच आहे. जळगाव येथील ५१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद ते भोकरदन अशी एसटी बस सोमवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सोडून पुन्हा जाफराबादकडे जात असताना भोकरदन तालुक्यातील अन्वा पाटीच्या पुढे मळणीयंत्र शोरूम जवळील रोडवर विना क्रमांकाच्या हिरो होंडा गाडीवर तोंड बांधून आलेल्या अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. बसचे चालक राजू पांडुरंग बोराडे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यभरातील एसटी स्थानक आणि बस डेपोमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील कामगारांनाही या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. येथील ५१ कर्मचाऱ्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले असून १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
वाढीव वेतन देण्यास सुरुवात
एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. नियमित कामांवर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन (नोव्हेंबर पेड इन डिसेंबर) अदा करण्यात आले.