ढाका (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचा ऑफस्पिनर साजिद खानच्या (३५ धावांमध्ये ६ विकेट) अचूक माऱ्यासमोर बांगलादेशची तारांबळ उडाली आणि दुसऱ्या कसोटीत चौथ्याअखेर यजमानांची ७ बाद ७६ धावा अशी अवस्था झाली आहे. बांगलादेश अद्याप २२४ धावांनी पिछाडीवर आहेत. पाकिस्तानला प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोऑन लादण्यासह मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. पाहुण्यांनी पहिला डाव ४ बाद ३०० धावांवर घोषित केला आहे.
चौथ्या दिवशी मंगळवारी पाऊणतास आधी पाकिस्तानने पहिला डाव घोषित केला. बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली. साजिदने आघाडी फळी मोडून काढल्याने चहापानाला बांगलादेशची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली. तिसरे सत्र खेळून काढले तरी यजमानांनी आणखी ५४ धावांची भर घातली तरी आणखी चार विकेट गमावल्या. बांगलादेशकडून केवळ नजमुल होसेन शांतो (३० धावा) आणि अष्टपैलू शाकीब अल हसनला (खेळत आहे २३) दोन आकडी धावा करता आल्यात. उर्वरित फलंदाजांमध्ये सलामीवीर महमुदुल हसन जॉय आणि मधल्या फळीतील मेहिदी हसन मिराजला खातेही उघडता आलेले नाही. अन्य सलामीवीर शादमन इस्लाम (३), कर्णधार मोमिनुल हक (१), मुशफिकुर रहिम (५) आणि लिटन दासना (६) जेमतेम खाते उघडता आले. ऑफस्पिनर साजिद खानने अप्रतिम मारा करताना १२ षटकांपैकी तीन निर्धाव (मेडन) टाकताना ३५ धावा देत ६ विकेट टिपल्या. कर्णधार मोमिनुल धावचीत झाला.
दुसऱ्या कसोटीला पावसाचा फटका पडला आहे. तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. चौथ्या दिवशीही अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. पहिल्या चार दिवसांत दोन्ही संघांचा एकही डाव न झाल्याने हा सामना अनिर्णितावस्थेकडे झुकला आहे.