Saturday, January 24, 2026

मुलाच्या प्रचारासाठी महावितरणची यंत्रणा वापरणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुलाच्या प्रचारासाठी महावितरणची यंत्रणा वापरणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुंबई  : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत हे प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदासाठी निवडणूक लढवत आहेत. परंतु, या निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचा आरोप भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला असून नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रांत पाटील यांनी नवी मुंबईतील वाशी येथे ६ डिसेंबर रोजी महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तसेच, कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी? याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी 'वरून दबाव' आहे. तसेच, या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल. मदत न केल्यास त्याचेही 'फळ' मिळेल, अशा भाषेत महावितरण चे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते. या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश करून संबंधित अधिकाऱ्यांना जाबही विचारला.

यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजिवांना निवडणुकीत कसे सहाय्य करावयाचे आहे, याची टिपणे आढळून आली आहेत. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >