मुंबई : कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांनी ध्येयवादी आणि सनदशीर मार्गाने संघटना चालवून गिरणी कामगारांचे जीवनमान उंचाविले. त्याच मार्गाने देशातील एनटीसी गिरण्या टिकविण्याचे राष्ट्रीय काम अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले आहे. तेव्हा आजची कामगार चळवळ सनदशिर मार्गानेच पुढे जाईल,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे केले.
संस्थेचे आद्य संस्थापक गं. द. आंबेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मंगळवारपासून परेल मझदूर मंझील येथे आंबेकर स्मृती सप्ताह सुरू झाला. त्याचे उद्घाटन गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने पार पडले. यंदा राष्ट्रीय मिल मजदूर संघ अमृत महोत्सवी वर्षात वाटचाल करीत आहे. आंबेकर स्मृती सप्ताह गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.