राजापूर (प्रतिनिधी) : एक-एक मावळा जोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे पक्ष आणि पक्ष संघटना वाढवायची असेल, तर त्यासाठी आपल्यालाही गाव, वाडी आणि वस्तीवर जाऊन माणसे जोडावी लागतील. पक्षासाठी वेळ देऊन प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता ही पक्षाची खरी शक्ती आहे. या कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ देऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पाचल येथे केले.
भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पतसंस्थेच्या कामातून जरा आता पक्षसंघटना वाढीसाठी वेळ काढला पाहिजे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांना हजेरी लावून मार्गदर्शन केले पाहिजे, असे नमूद करतानाच राजापूर तालुका अध्यक्षांनी आता तालुक्यात विभागनिहाय बैठका घेऊन त्यावर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करून त्या त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि समस्या या पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत, अशा सूचनाही यावेळी राणे यांनी दिल्या. पक्षासाठी प्रत्येकाला वेळ देऊन काम करावेच लागेल, असे नमूद केले.
राज्यातील ठाकरे सरकारचे अपयश, नियोजनशून्य कारभार आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय या विरोधात आपण उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. निलेश राणे रविवारी राजापूर व लांजा तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी राजापूर तालुक्यातील पाचल विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पाचल ग्राम सचिवालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव, महिला आघाडीच्या नेत्या उल्का विश्वासराव, माजी पंचायत समिती सदस्य भास्कर सुतार, लांजा तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर, सिद्धार्थ जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राणे यांनी आगामी काळात येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायची असेल, तर त्यासाठी आतापासूनच नियोजन केले पाहिजे. बुथ कमिट्या बळकट करतानाच गाव, वाडी आणि वस्तीवर जाऊन तुम्हाला काम करावे लागेल, एक एक माणूस पक्षाशी जोडावा लागेल. तरच एक रिंगण तयार होईल आणि पक्ष संघटना अधिक बळकट होईल, मात्र यासाठी पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाला पक्षाचे आणि पक्ष वाढीचे वेड लागले पाहिजे, असेही राणे म्हणाले.