रत्नागिरी : पावसाला पोषक हवामान झाल्याने कमाल तापमानात घट झाली तर किमान तापमानात वाढ झाल्याने रत्नागिरीत काही भागात गारठा वाढू लागला आहे. ५ ते ९ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचा जोर ओसरू लागला असल्याने कोकणात थंडी परतण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.
आगामी आठवड्याच्या कालावधीत कोकण किनारी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. वाढलेले किमान तापमान कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तर रायगड जिल्ह्यात सरासरीइतका पाऊस झाला. चालू आठवड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी आगामी आठवड्यात अवकाळीचे सातत्य राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची अटकळ आहे. ९ डिसेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे