Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणविकासापासून वंचित ठेवणाऱ्या खासदार, आमदारांवर बहिष्कार घाला

विकासापासून वंचित ठेवणाऱ्या खासदार, आमदारांवर बहिष्कार घाला

निलेश राणे यांचा घणाघात

लांजा (प्रतिनिधी) : कायमच भावनिक राजकारण करून निवडून येऊन मग विकासाची पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना हद्दपार करा. प्रसंगी त्यांच्यावर बहिष्कार घाला, असे आवाहन भाजप प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी रिंगणे कोंडगे येथे बोलताना केले.

रिंगणे कोंडगे येथील कोंगडे गुरववाडी ते स्मशानभुमीकडे जाणाऱ्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेल्या रस्त्याचा शुभारंभ रविवारी निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, लांजा तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर, महिला आघाडी नेत्या उल्का विश्वासराव, संजय आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याने हा रस्ता पूर्णत्वाला गेला आहे. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळ माने व या महिला नेत्या उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नाने हा रस्ता मार्गी लागला आहे.

या प्रसंगी बोलताना निलेश राणे यांनी भाजपच्या माध्यमातूनच विकास होऊ शकतो, असे नमूद करत भविष्यातही तुम्ही दिलेली कामे आम्ही नक्कीच मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. मात्र ज्यांना जनतेने निवडून दिले ते शिवसेनेचे आमदार आणि खासदार काय करतातय? असा खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला. आमदारांना चार कोटी आणि खासदारांना पाच कोटींचा विकास निधी वर्षाला मिळतो यातील तुमच्या गावासाठी किती निधी त्यांनी दिला? याचा विचार करा असे राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -