पुणे (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी टायटॅनिक बोट आहे, तर भाजप सेफ बोट आहे, अशी खोचक टीका केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. तसेच त्यांच्या बोटीत कोणी चढणार नाही आणि आमच्या बोटीला काही होणार नाही, असेही केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला शेलक्या शब्दांत सुनावले आहे. पुण्यातल्या सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी राणे म्हणाले, “आमच्यातून जाण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. टायटॅनिकच्या बोटीत कोणी बसणार नाही. आमची सेफ बोट आहे. येथून सुटते आणि थेट दिल्लीला पोहोचते. शिवसेनेचे काही खरे नाही. टायटॅनिक बोट शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिघांची आहे. प्रत्येकजण आपल्या बाजूने खेचत असतो, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांमुळे मी केंद्रात मंत्री
माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा होतो, पण व्हाया देवेंद्र फडणवीस असा आहे. दिल्लीत जा असा आदेश त्यांनी दिला. आम्ही आदेश पाळतो. दिल्लीत आता मी सुखी आहे. महिन्याला पुण्यात येणारा माणूस चार महिन्यांनी पुण्यात आला, तुमच्या माझ्यातील अंतर यांनी वाढवलं, याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहेत, असं नारायण राणे म्हणाले. हातातलं घड्याळ बीजेपीचं नाही, राष्ट्रवादीचं आहे, त्यामुळे आता थांबायला हवं, पुढे कार्यक्रम आहेत, असं नारायण राणे म्हणाले.
मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?
मिलिंद नार्वेकर यांनी काल बाबरी मशीद बलिदान दिवस असल्याचं ट्वीट केलं होतं. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. नार्वेकरांचं बरोबरच आहे. त्यात चुकीचं काय, असे फडणवीस म्हणाले. मात्र, तेवढ्यात नारायण राणे म्हणाले, “नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?” असं म्हणताच त्यावर पुढे काहीही न बोलता राणे निघून गेले.
देशाला बाबासाहेबांची गरज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. ६ डिसेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे, हा कार्यक्रम भावनिक आहे, कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे. अनेक जण असे म्युझियम बनवतात, बाबासाहेब यांचं नाव सांगून, अनेक गोष्टी तिथं ठेवतात. पण त्या सगळ्या खऱ्या असतात असं नाही, पण इथल्या म्युझियममधल्या वस्तू खऱ्या आहेत. डॉ. बाबासाहेब इथे जन्माला आले याचा अभिमान वाटतो. आज देशाला बाबासाहेबांची गरज आहे, असं नारायण राणे म्हणाले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात जे काम केलं, घटना लिहिलं त्या घटनेच कौतुक सगळीकडे होतंय. मराठा आरक्षणाबद्दल खूप आंदोलने झाली, विरोधकांनीही खूप टीका केली, म्हणे हे आरक्षण घटनेत बसत नाही. मग तज्ज्ञांनी उत्तर दिले. घटनेच्या कलम १५/४ प्रमाणे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करा, असे नारायण राणे म्हणाले. आत्मनिर्भर होण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आवश्यक आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक एक गुण आत्मसात केला, तर अमेरिका आणि चीननंतर आपला देश महासत्ता होणार असल्याचे नारायण राणे म्हणाले.
‘पुण्यात भाजपचेच अस्तित्व जाणवते’
पुणे येथे लोकोपयोगी कामे होत असताना सत्ता आणि संघटन एकत्रित काम करीत आहेत, त्यामुळे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) शहर भाजपच्या वतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन, बोधचिन्ह आणि पक्षाच्या यूट्यूब चॅनेलचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क हे भाजपचे पारंपरिक शक्तिस्थळ आहे. मतदारांपर्यंत केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि योजना पोहोचवा. त्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान महत्त्वाचे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ते मनावर घ्या, असे फडणवीस म्हणाले. पुणेकरांना नागरी सुविधा देऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करा. भाजपचे पुण्यात वर्चस्व आहे. लोकसंपर्क, लोकांचा विश्वास, जागरूकता, नियोजन, जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणाची जोड यामुळे निवडणुकीत विजय खेचून आणण्याचे कौशल्य प्राप्त करता येते. राजकारणात केवळ आत्मविश्वास कामाचा नाही, तर सैन्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळेपर्यंत जागरूक राहायला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.