मुंबई : वरळी बीडीडी चाळ सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.
वरळी बीडीडी चाळीतील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात एकाच कुंटुबातील चार जण जखमी झाले होते. सोमवारपर्यंत त्यातील तिघांचा मुत्यू झाला आहे. आधी चार महिन्यांच्या लहान मुलाचा, त्यानंतर त्याच्या वडिलांचा आणि सोमवारी त्याच्या आईचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. स्फोटानंतर जखमींना मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे अनेकांनी या प्रकरणी टीका केली होती.
दरम्यान ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे. स्थानिक आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
वाचलेल्या बाळाचे शिवसेनेने स्विकारले पालकत्व
बीडीडी चाळीत सिलेंडर स्फोट होऊन एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या कुटूंबातील ५ वर्षांचा एकटा मुलगा वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलाची जबाबदारी मी स्वत: आणि शिवसेनेने घेतली आहे. यापुढे मी आणि शिवसेना या बाळाचे पालक असू, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.