मुंबई : डोंबिवलीत राज्यातला पहिला ओमायक्रॉन या व्हेरिएंटची लागण झालेला रुग्ण सापडल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही ओमायक्रॉनबाधित ७ रुग्ण आढळले. तर आज मुंबईत देखील दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बरोबरच राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता १० वर पोहोचली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील जोहांसबर्ग येथून २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या या ३७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. तसेच या रुग्णासोबत राहिलेल्या आणि २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून आलेल्या त्याच्या ३६ वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे.
ज्या दोघांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे त्यांनी फायझर लशीचे डोस घेतले आहेत. मात्र हे दोघे आतापर्यंत ३२० जणांच्या संपर्कात होते ही अधिक चिंता वाढवणारी बातमी आहे. विशेष म्हणजे या दोघांना कोणतीही लक्षणे नसून सध्या हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल आहेत. या दोन्ही रुग्णांच्या ५ अतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.