सीमा दाते
मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. गेली चार दशकं मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे; तर दुसरीकडे भाजपने देखील कंबर कसली आहे. २०१७ साली थोड्याशा संख्याबळाच्या फरकाने पालिकेची सत्ता मिळवण्यापासून भाजप दूर राहिली. मात्र आता आगामी निवडणुकीत भाजपने बाजी मारण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेनंतर भाजप हा दुसरा मोठा पक्ष आहे. पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे ९९, तर भाजपचे ८३ नगरसेवक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप सत्ता मिळवण्यासाठी तयार आहे.
महापालिका गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या हातात असल्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असेल. त्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना अशीच रंगणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मुंबईतील प्रभागांची फेररचना करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतशा आरोप-प्रत्यारोप आणि आपला पक्ष किती सरस आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. सत्ताधारी पक्ष सध्या मुंबईकरांच्या समस्यांऐवजी केवळ निवडणुकीची तयारी करत आहे. याचंच उदाहरण म्हणजे पालिका सभेत झालेला गोंधळ. शुक्रवारी नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाच्या मुद्द्यावर सभागृहात शिवसेना-भाजपमध्ये वादावादी झाली. महत्त्वाचं म्हणजे, मूळ विषय बाजूला राहून केवळ राजकारण पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबईकरांचे प्रश्न आणि समस्या याबाबत सत्ताधाऱ्यांना काहीच पडलेले नाही का, असा प्रश्न पडतोय. बरं, इतकेच नाही तर, कामकाज संपल्यानंतर देखील सभागृहाबाहेर झालेला गोंधळ म्हणजे केवळ सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेले शक्तिप्रदर्शन नव्हे ना? हाही प्रश्न आहेच.
गेली कित्येक वर्षे नैसर्गिक युती म्हणत शिवसेना व भाजप एकत्र निवडणूक लढत होत्या. सत्तेतही एकत्रित होत्या. मात्र २०१९मध्ये ही युती तुटली आणि शिवसेनेने विचारधारा न जुळणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. आता या निवडणुकीत स्वबळावर लढून मुंबईत जिंकणं, हे शिवसेनेसाठी एक आव्हान आहे. एकीकडे २०१७च्या वचनांची पूर्तता न झाल्याने आणि दुसरीकडे अनैसर्गिक म्हटली जाणारी युती केल्याने शिवसैनिक नाराज झाला आहे. त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम शिवसेनेच्या व्होट बँकेवर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा असल्याने मुंबईत पुन्हा मराठी मतं विभागली जाणार आणि यामुळे मतदार भाजपला कौल देऊ शकतात. २०१७मध्ये भाजपचे ८३ नगरसेवक निवडून आल्याने या निवडणुकीत ही संख्या वाढवण्यासाठीचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत. त्यामुळे भाजपकडे सत्ता जाण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीमध्ये पालिका निवडणूक अपेक्षित आहे. मात्र प्रभागवाढीच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा वटहुकूम जारी झाला आहे. मात्र पालिकेला याबाबतची अधिसूचना मिळाल्यानंतर प्रभागांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक पुढे जाण्याची चर्चा सुरू आहे. मात्र असं असताना राजकीय पक्ष मात्र आपल्या तयारीत जोरदार उतरले आहेत.
सध्या मुंबईतील पाणी, रस्ते, आरोग्य या समस्यांकडे सत्ताधाऱ्यांनी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुकीकडे न पाहता मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यावर भर देणे महत्त्वाचं असताना केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कार्यक्रम राबवले जात आहेत. इतकी वर्षं पालिका जिच्या ताब्यात आहे, त्या शिवसेनेकडून मुंबईकरांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. मात्र सध्या सत्ताधाऱ्यांकडून भाजप कसा पक्ष आहे, याबाबत राजकारण करण्यात वेळ जात आहे. त्यामुळे साहजिकच भाजप या निवडणुकीत पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे. एकीकडे मुंबईकरांच्या समस्यांवर भाजप लढताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे संघटन मजबूत करण्यावर भाजप नेत्यांनी भर दिलाय, यामुळे या निवडणुकीचा कौल भाजपच्या बाजूने लागणार असे दिसतेय.