उरण (वार्ताहर) : देशातील सर्वात लांब सी-लिंक असलेल्या शिवडी-न्हावा ट्रान्सहार्बर प्रकल्पाचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली आहे. या सागरी सेतूसाठी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या १०८९ खांबांपैकी ७०२ खांब उभारले गेले आहेत. २०२४ पर्यंत तो पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा प्रकल्प मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एप्रिल २००८ पासून या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मुंबईतून नवी मुंबईला वाहनाने जाताना रहदारीचे अनेक रस्ते पार करावे लागतात. ट्रॅफिकमुळे प्रवासाचा वेळ वाढतो. शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहनांना मुंबईतून थेट न्हावा शेवापर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळही कमी होईल आणि मुंबई-नवी मुंबई दरम्यानच्या रस्त्यांवरील वाहतुकीची होणारी कोंडीही दूर होईल.